ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दिली.

राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.








