पुढील काळात अधिक सतर्क राहण्याची गरज : दुसरी लाट उद्भवू न देण्याचे आव्हान : नियमांचे पालन केले जावे
कोरोनाचा संसर्ग आता पूर्वीच्या तुलनेत देशात कमी आढळून येत आहे. या महामारीतून बरे झालेल्यांचे प्रमाण 86 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 18 राज्यांमध्ये बरे होणाऱयांचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक आहे. बरे होणाऱयांचा आकडा सक्रीय रुग्णांच्या तुलनेत 7 पट अधिक आहे. ऑगस्टनंतर पहिल्यांदाच 6 ऑक्टोबर रोजी एका दिवसात सर्वात कमी 61,267 नवे रुग्ण आढळले होते. आगामी काळात ही संख्या आणखीन कमी होईल अशी अपेक्षा आहे. कोविड-19 महामारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची चिन्हे आहेत. या बदललेल्या चित्राचे संपूर्ण श्रेय प्रशासन आणि समाजाला जाते.
चेतना, सतर्कता अन् जागरुकता
परंतु आम्हाला गाफिल होऊन चालणार आहे. चेतना, सतर्कता आणि जागरुकता कायम ठेवावी लागणार आहे. जगातील प्रत्येक 10 पैकी 1 व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या हिशेबानुसार भारतातील सुमारे 13 कोटी लोकसंख्या या संसर्गाला सामोरी गेली असणार आहे. यातील बहुतांश जण लक्षणेरहित असतील. हे संसर्गाच्या फैलावाचे मोठे वाहक ठरू शकतात. 17 ऑक्टोबरपासून सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. सणासुदीत लोक अधिक बाहेर पडतात, लोकांमध्ये मिसळतात, खरेदी करतात. परंतु हे सर्व करताना खबरदारी आणि सतर्कता बाळगणे आता गरजेचे आहे. केरळ आणि महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये अलिकडच्या सणांनंतर नव्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे.
निष्काळजीपणा धोकादायक
रुग्णसंख्येने टोक गाठल्यावर लोक बेपर्वा झाल्याने पाश्चिमात्य देशांमध्ये आता ही महामारी पुन्हा फैलावू लागली आहे. आम्हाला या महामारीचा आणखी एक टप्पा आणू देणे परवडणारे नाही. सदैव मास्क लावूनच बाहेर पडावे आणि शारीरिक अंतर कायम राखले जावे. विविध कार्य-जबाबदाऱया पूर्ण करताना शासकीय दिशानिर्देशांचे पालन केले जावे. आसुरी शक्तींवर विजयाचे प्रतीक नवरात्र आणि विजयादशमीवेळी या विषाणूच्या खात्म्याचा संकल्प घेतला जावा.
पहिल्या लाटेवर नियंत्रण?
भारतात प्रतिदिन नव्या रुग्णांची कमी संख्या पाहता पहिल्या लाटेवर विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचदरम्यान एका अध्ययनानुसार सणासुदीच्या काळात दुसरी लाट उद्भवू शकते. काही राज्यांमध्ये गणेशोत्सव आणि ओणम यासारख्या सणांदरम्यान बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती आणि आगामी सणासुदीच्या काळात ही स्थिती निर्माण होऊ शकते.
उल्हासावर अंकुश आवश्यक
गणेशोत्सव आणि ओणम यासारख्या सणांदरम्यान काही राज्यांमध्ये कोविड-19 चे संक्रमण आणि बळींमध्ये वाढ झाली होती. मोठय़ा प्रमाणावर लोक बाहेर पडण्यासह शारीरिक अंतर, मास्क वापरणे आणि हातांच्या स्वच्छतेवर लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. आगामी सणांदरम्यानही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
रुग्णसंख्या घटण्याचा दर
मार्च महिन्यात एकेदिनी कोरोनाबाधितांचा आकडा 100 होता. भारताचा कोविड-19 आलेख 173 दिवसांमध्ये सप्टेंबरपर्यंत 97 हजार रुग्ण प्रतिदिनापर्यंत पोहोचला होता. भारत मार्चच्या स्तरापर्यंत पुन्हा कधी पोहोचणार हा खरा प्रश्न आहे. एसबीआयच्या अहवालानुसार बहुतांश पाश्चिमाय देशांमध्ये रुग्णसंख्या एकदा कमी झाल्यावर पुन्हा वाढू लागली आहे. परंतु जपान, स्वीडन आणि पेरू याला अपवाद आहेत. कोरोना रुग्णांच्या प्रतिदिन संख्येने टोक गाठणे म्हणजे महामारीच खात्मा नव्हे. अनेक युरोपीय देशांमध्ये हे चित्र दिसून आले आहे.
नेपाळ : 1 लाख रुग्ण
नेपाळमध्ये दिवसभरात 5,008 नवे रुग्ण आढळले आहे. याचबरोबर देशीतल बाधितांचा आकडा 1 लाख 5 हजार 684 झाला आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयानुसार काही आठवडय़ांमध्ये संसर्ग वाढला आहे. तेथे मागील 4 आठवडय़ांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
राजधानी काठमांडू सर्वाधिक प्रभावित आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी सुमारे एक तृतीयांश काठमांडूत सापडले आहेत. संसर्गामुळे 614 जणांना जीव गमवावा लागला आहे. नेपाळच्या दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरिया : नियम शिथिल
दक्षिण कोरियात सोमवारपासून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमध्ये दिलासा देण्यात आला आहे. तेथे नाइटक्लब, बार आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. स्टेडियमच्या क्षमतेच्या 30 टक्के प्रेक्षकांसह क्रीडास्पर्धांच्या आयोजनाची अनुमती असेल.
देशभरात सोशल डिस्टन्सिंगमध्ये दिलासा देऊ पण, धोक्याकडे दुर्लक्ष करणार नाही. डोअर टू डोअर बिझनेस, धार्मिक आयोजनावरील बंदी कायम राहणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
इस्रायल : 3 लाखासमीप
इस्रायलमध्ये दिवसभरात 618 नवे रुग्ण आढळले आहेत. तेथील बाधितांची संख्या आता 2 लाख 90 हजार 493 झाली आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 28 हजार 658 जण बरे झाले आहेत. कोविड-19 च्या उपचारासाठी एक अँटीबॉडी कॉकटेल विकसित करत असल्याची माहिती तेल अवीव विद्यापीठाने दिली आहे.
फ्रान्स : उच्चांकी रुग्ण
फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये उच्चांकी 26 हजार 896 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचा आकडा आता 7 लाख 18 हजार 873 झाला आहे. फ्रान्समध्ये मागील काही आठवडय़ांपासून नवे रुग्ण वाढत आहेत. मागील 1 आठवडय़ापासून तेथे दरदिनी 11 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत.
देशात आतापर्यंत 32 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी पॅरिस आणि परिसर सर्वाधिक प्रभावित आहे. सरकारने पॅरिससह अनेक भागांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.









