प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याच सणांना परवानगी मिळाली नाही. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती, गणेशोत्सवही अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यास सांगितल्याने ते साध्या पद्धतीनेच साजरे झाले होते. रविवारी राज्योत्सवाच्या कार्यक्रमात मात्र कोविड-19 मार्गसूची अक्षरश: धाब्यावर बसविण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या धिंगाण्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. कोरोना रुग्णांना सिव्हिलला घेऊन जाण्यातही अडचण निर्माण झाली होती.
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हय़ातील प्रमुख मंदिरांतील देवदर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या मार्गसूचीकडे बोट दाखवून जिल्हा प्रशासन साधेपणा राखण्याचा सल्ला देत होते. रविवारी राज्योत्सव मिरवणुकीला फाटा देण्यात आला असला तरी कित्तूर चन्नम्मा चौकात प्रचंड गर्दी जमवून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. या गर्दीला कोरोनाचे नियम लागू नव्हते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर चन्नम्मांच्या चबुतऱयाचे महानगरपालिकेच्यावतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर चन्नम्मा चौकात आतषबाजी सुरू झाली. गर्दीतील बहुतेक जणांच्या चेहऱयावर मास्क नव्हता. सामाजिक अंतराची तर पूर्णपणे ऐशीतैशी करण्यात आली होती.
बंदोबस्तासाठी वरि÷ पोलीस अधिकारी या परिसरात तळ ठोकून होते. कोरोना महामारी आता कोठे आटोक्मयात येत आहे. या गर्दीला याचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून आले. एरवी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराची शिकवण देणाऱया जिल्हा प्रशासनातील अधिकाऱयांनी मात्र सोयीस्करपणे याकडे डोळेझाक केल्याचे दिसून आले. त्यामुळे सायंकाळनंतरही चन्नम्मा चौकात गर्दी होती.
दगडफेक, सौम्य लाठीमार
कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात रविवारी दुपारी बसवर दगडफेकीचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री महानगरपालिकेच्या इमारतीवर काही जणांनी चोरून लाल पिवळा फडकाविला होता. पोलिसांनी तो जप्त केला. मराठा मंदिर येथे सुरू असलेला काळा दिन कार्यक्रम उधळण्यासाठी काही जण ओव्हरब्रिजवरून जात होते. यावेळी पोलिसांनी रक्षण वेदिकेच्या पंधराहून अधिक जणांना ताब्यात घेतले.









