प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना म्हणजे माणसाच्या मनामध्ये एक वेगळी भिती निर्माण होते. या भितीपोटी रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र तेथील बिलांची रक्कम पाहता कोरोनापेक्षाही हॉस्पिटलचाच दणका मोठा असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याबाबत कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, जायंटस् गुप ऑफ बेळगाव आणि तालुका म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देवून हॉस्पिटल्सनी जी बिले वसुल केली आहेत त्याची चौकशी करुन संबंधित हॉस्पिटलांवर कठोरात कठोर कारवाई करावी,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
दरम्यान महत्वाचे म्हणजे कोरोना रुग्णाला एकाच प्रकारचे उपचार केले जातात. मात्र एका हॉस्पिटलचे बिल 6 लाख तर एका हॉस्पिटलचे बिल 8 लाख आणि तिसऱया हॉस्पिटलचे बील साडेतीन लाख, आणखी एका हॉस्पिटलचे बिल 2 लाख 66 हजार तर काही हॉस्पिटलचे बील साडेचार लाख अशा प्रकारे बिलाची रक्कम वसुल करण्यात आली. एकच आजार, एकच उपचार मग दरामध्ये तफावत कसली? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला.
खासगी हॉस्पिटल्सनी एक प्रकारे सर्वसामान्य जनतेची कोरोनाच्या नावाखाली लुट चालविल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारने दिलेल्या मार्गसुचीनुसार हॉस्पिटल्सनी बिल आकारले पाहिजे होते. मात्र मनमानीपणे बिल आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. कोरोना काळात वास्तविक रुग्णांना सेवा देणे हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडणे गरजेचे होते. मात्र कोरोना हीच पैसे कमविण्याची संधी म्हणून अनेक खासगी हॉस्पिटल्सनी नागरिकांना ओरबडून खाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या प्रकारामुळे सर्वसामान्य जनता तणावाखाली आहे. उपचार करुनही अनेकांचे मृत्यू झाले आहेत. तरीही त्यांच्या कुटुंबियांकडून अथवा नातेवाईकांकडून मनमानीपणे बीले वसुल करण्यात आली आहेत. काहीवेळा कोरोना म्हणून उपचार करण्यात आले. मात्र मृत्यूनंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खरोखरच कोरोनावर उपचार करण्यात आले होते की केवळ आपली झोळी भरुन घेण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले? याची चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, ऍड. नागेश सातेरी, माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. एम. जी. पाटील, बी. डी. मोहनगेकर, शुभम शेळके, दिगंबर किल्लेकर, जायटंस् ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष संजय पाटील, मोहन कारेकर, मदन बामणे, मधू बेळगावकर, ऍड. अजय सातेरी, मधुसुदन पाटील, एस. व्ही. जाधव, किर्ती व्ही. पाटील, के. व्हाय. घाटेगस्ती, चंद्रकांत पाटील, अविनाश पाटील, प्रभाकर जगताप, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









