प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने दुसऱया लाटेची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने उपचारांच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. सीपीआरसह आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून उर्वरित हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.
शहरात कोरोना रुग्णांची हळूहळू वाढत आहे. महापालिका प्रशासनाने मास्क, सॅनिटायझरचा वापर यासंदर्भात जनजागृती करण्याबरोबर विना मास्क फिरणाऱयांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. आता आरोग्य यंत्रणाही अधिक कार्यान्वित केली आहे. सध्या आयसोलेशन हॉस्पिटल येथे कोरोनाच्या सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सानेगुरुजी, कसबा बावडा, फुलेवाडीतील माने हॉल, दुधाळी यासह इतर दवाखाने व कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत, अशी माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.
बेक दिलेल्या शंभर जणांना पुन्हा निमंत्रण
कोरोनाच्या काळात महापालिकेचे दवाखाने, कोविड केअर सेंटरमध्ये ताप्तुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर डॉक्टर, नर्स, ब्रदर्स व इतर पॅरामेडिकल स्टाफ नेमला होता. अशा स्टाफची संख्या सुमारे शंभर आहे. यांना कोरोनाची साथ ओसरल्यानंतर ब्रेक देण्यात आला होता. त्यांना आता पुन्हा दुसऱया लाटेचा संभाव्य धोका गृहित धरुन सेवेत हजर होण्यास सांगितले आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी नियम आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी उपाययोजना, उपचार आणि प्रबोधन सुरु आहे. नागरिकांनी महापालिकेच्या आवाहनाला साथ द्यावी. निखिल मोरे, उपायुक्त कोमनपा









