जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची माहिती, पुरेशा बेडसह ऑक्सिजन उपलब्ध, -व्हेंटीलेटर ऑपरेटरची संख्या कमी
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ऑक्सिजनेटेड बेडसह पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. पण व्हेंटीलेटर ऑपरेट करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांची संख्या कमी आहे. त्यामुळे शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचाऱयांना व्हेंटीलेटर ऑपरेट करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे लहान मुलांचे व्हेंटीलेटर ऑपरेट करण्याचे प्रशिक्षण सध्या सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जिह्यात आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजन निर्मिती सुरु आहे. ऑक्सिज सिलींडरदेखील पुरेसे आहे. आता लिक्विड ऑक्सिजच्या बाबतीत महिनाअखेरपर्यंत जिल्हा परिपूर्ण होईल. त्यामुळे तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
जेवण पुरवणाऱया ठेकेदारांची बिले आठवड्याभरात जमा
कोविड केंद्रामध्ये रुग्णांना जेवण पुरविणाऱया ठेकेदारांची जुलैअखेरपर्यंतची बिले जिल्हा प्रशासनाकडून संबंधित आरोग्य यंत्रणेकडे जमा केली आहेत.त्यामुळे येत्या आठवड्याभरात ठेकेदारांना बिले मिळतील. तसेच ऑगस्टअखेरपर्यंत मनुष्यबळ पुरविणाऱया एजन्सींची बिले `एनआरएचएम’ कडे पाठवली आहेत. त्यांच्याकडून निधीची पुर्तता झाल्यानंतर त्वरीत त्यांची बिले अदा केली जातील, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
पूरबाधित गावांच्या पुनवर्सनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार
पूरबाधित गावांचे इतरत्र पुनर्वसन करण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. पुनर्वसनाबाबत उच्च न्यायालयाकडूनही आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागासोबतही चर्चा सुरु आहे. पुनर्वसनाबाबत तालुकानिहाय आराखडे तयार करून दीड ते दोन महिन्यामध्ये ते शासनाकडे पाठवले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ऑक्टोबरअखेरपर्यंत शहराच्या रेड आणि ब्लू लाईन निश्चित करण्याचे काम पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासनाकडून प्राप्त निधी पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा
पूरबाधित घरे आणि व्यवसायिकांच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधी पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा केला आहे. यामध्ये लिपिकांच्या चुकीमुळे काळी पूरग्रस्तांना 5 हजार, काहींना 10 हजार तर काहींना अडीच हजार रूपयेच मिळाले आहेत. ही चूक पुढील हप्त्यामध्ये दुरुस्त करून घरांचे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटूंबियांना 10 रूपये दिले जातील असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
प्रत्येक पूरग्रस्तांनी मोफत धान्याचा लाभ घ्यावा
पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून शासनाने दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू रेशन दुकानांमार्फत उपलब्ध केले आहे. ज्यांना हे धान्य मिळालेले नाही, त्यांनी तलाठ्याकडून पूरबाधित असल्याचा दाखल घेऊन संबंधित रेशन दुकानातून धान्य घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.
गुंडागर्दी करणाऱ्या मायक्रोफायनान्सच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
मायक्रोफायनान्स कंपनीच्या थकीत कर्जापोटी त्यांच्या कर्मचाऱयांकडून कर्जदार महिलेच्या घरातील वस्तू, दुचाकी गाडी जबरदस्तीने नेली जात आहे. कर्ज वसुलीसाठी गुंडगीरी केली जात आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱयांना धडा शिकवण्यासाठी महिलांनी धाडसाने पुढे येऊन त्यांच्यावर पोलीसात गुन्हे दाखल करावे. पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल केली जात असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.









