गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केवळ देशासमोरच नव्हे, तर जगासमोरच सध्या कोरोनाचे भीषण आव्हान उभे असले तरी भारतीय नागरिकांचा निर्धार अचल आहे. त्याच्या उत्साहात तसूभरही कमतरता आलेली नाही. भारताची विविधता आणि गणतंत्र यांची प्रशंसा सारे जग करीत आहे. लोकतंत्र, न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुभाव हे आपल्या व्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत, अशी भलावण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे. ते 73 व्या गणतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण करीत होते.
या आव्हानात्मक वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रांमध्ये साधलेली प्रगती अभूतपूर्व आहे. या प्रगतीचे सारे श्रेय देशावासियांचेच आहे. तीनच दिवसांपूर्वी आपण सर्वांनी स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त स्मरण केले. त्यांनी जय हिंद ही घोषणा देशाला दिली. स्वातंत्र्यासाठी संग्राम केलेल्या सर्व वीरांचा सन्मान केला पाहिजे. ते नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यसेनानींचा गौरव केला.
ऑलिंपिक विजेत्यांचाही गुणगौरव
कोरोनामुळे गेली जवळपास दोन वर्षे क्रिडा क्षेत्रात मंदगती संचारली होती. तथापि, तशाही स्थितीत आपल्या खेळाडूंनी प्रचंड कष्ट घेऊन भारताला ऑलिंपिक स्पर्धेत पदके मिळवून दिली. देशाला त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून दिली. कोरोना हटविण्यासाठी साऱया देशाने एक दृढसंकल्प केला असून डॉक्टर्स, नर्स, परिचारक व परिचारिका इत्यादी योद्धय़ांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचविले. अद्याप कोरोना संपला नसून आपण साऱयांनी कोरोनाच्या नियमांचे कसोशीने पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही राष्ट्रपती कोविंद यांनी केले.
महिलांचाही गौरव
देशातील महिलांनी सर्व अडथळय़ांवर मात करत प्रगतीच्या दिशेने वेगवान धाव घेतली आहे. सर्व क्षेत्रांमध्ये आज महिलांचा बोलबाला असून त्या अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवरही आहेत. देशासाठी ही विशेष अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती कोविंद यांनी देशातील महिला शक्तीचा गौरव केला.









