निवडणुकांमुळे सरकारचे रुग्णवाढीकडे दुर्लक्ष : प्रचारामुळे बाधितांची संख्या वाढण्याची भीती
प्रतिनिधी /पणजी
कोरोनामुळे गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी 7 जणांचा बळी गेला असून 3232 नवे बाधित सापडले आहेत. कोरोना संसर्गाचा दर 45.85 टक्के एवढा वाढला झाला असून 7 बळींमुळे एकूण मृतांचा आकडा 3557 वर पोहोचला आहे. संसर्गात व बळीत वाढ होत असल्यामुळे जनतेमध्ये भीती पसरली आहे. त्यातच विधानसभा निवडणुका असल्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग वाढणार की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.
दिवसभरात 7049 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 3232 अहवाल पॉझिटिव्ह मिळाले असून 3201 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सक्रिय रुग्ण संख्या 21381 झाली असून 31 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले तर 8 जणांना तेथून घरी पाठविण्यात आले आणि 1922 जण बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत मिळून एकूण 210457 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातून 185537 जण बरे झाले. कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार यांचा घरोघरी प्रचार, देवदर्शन हे गर्दीचे प्रकार चालूच असल्याचे समोर येत आहे.
अर्धीच माहिती होतेय जाहीर
तिसऱया कोरोना लाटेतील 7 ही सर्वाधिक बळींची संख्या असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिदिन 3000 पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात सदर रुग्णवाढ झाली असून सरकारवर त्याचा कोणताच परिणाम दिसून येत नाही. सरकार, मंत्री हे सर्वजण विधानसभा निवडणुकीत गुंतले असून वाढता कोरोना संसर्गाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. शिवाय कोरोनासंबंधीची माहितीही पुर्णपणे जाहीर केली जात नाही, अशी परिस्थिती आहे.








