असंख्य लईराई देवीच्या भाविक व धोंडगणांचे देवीला साकडे लॉकडाऊन वाढल्यास काय? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह मयेतील रेडय़ांची जत्राही रद्द
डिचोली / प्रतिनिधी
सध्या भारतभर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील तसेच राज्यातीलही अनेक सण, उत्सवांवर बंदीची लाट आली आहे. दि. 28 रोजी होणाऱया शिरगावातील प्रसिद्ध देवी श्री लईराईची जत्रा व्हावी यासाठी सध्या देवीचे असंख्य धोंडगण व भाविक भक्त देवीलाच साकडे घालू लागले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून अनेकांनी देवीला साकडे घालणारे पोस्ट घातले असून ‘कोरोना’चे संकट लवकरच टळू दे, आणि लईराई देवीची जत्रा निर्विघ्नपणे होऊ दे, अशी मागणी भाविकांनी देवीच्या चरणी केली आहे.
दरम्यान मुळगावातील पेठेची जत्रा, मयेतील माल्यांची जत्रेनंतर दि. 15 रोजी मयेत होणारी प्रसिद्ध रेडय़ाची जत्राही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता जर लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आला तर काय ? असा प्रश्न असंख्य भाविकांना पडला आहे.
तरीही याबाबतीत सर्वचजण सध्या सकारात्मक विचार व्यक्त करीत असून देवीची जत्रा ही ठरलेल्या दिवशीच होणार अशी मजबूत श्रध्दापूर्वक भावना लोक व्यक्त करीत असून देवीच यातून काहीतरी मार्ग काढून आपला उत्सव करून घेणार, असाही भक्तीपूर्वक समज लोकांनी आपल्या मनात बांधून ठेवला आहे.
मयेतील प्रसिद्ध रेडय़ांची जत्रा रद्द
मुळगावची देवी केळबाईची पेठ मयेत चैत्र शुध्द पंचमीला रात्री आल्यानंतर तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर मयेतील प्रसिद्ध माल्यांची जत्रा होते. मात्र यावषी लॉकडाऊन असल्याने मुळगावननंतर मयेतीलही माल्यांची जत्रा रद्द करण्यात आली होती. माल्यांच्या जत्रेनंतर 15 दिवसांनंतर मयेत रेडय़ांची जत्रा होते. ती जत्रा यावषी दि. 15 रोजी साजरी करण्यात येणार होती. मात्र सध्याचा लॉकडाऊन जरी दि. 14 रोजी संपुष्टात येत असला तरी या जत्रेची कोणतीही तयारी करण्याची संधी आयोजकांना नसल्याने सदर जत्राही रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने जाहीर केला आहे. त्याचबरोबर यदाकदाचित लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यास या जत्रेवर पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण होऊ नये यासाठी देवस्थान समितीने आगाऊच सदर जत्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
माशेलहून तरंगदेवता येणार नाही
मयेतील या प्रसिद्ध रेडय़ांच्या जत्रेनिमित्त दरवषी माशेल गावातून देवकीकृष्ण व पिसो रवळनाथ या देवतांची तरंगे जलमार्गे होडीच्या साहाय्याने मयेतील पाटो येथे जत्रेच्या दिवशी दाखल होतात. व पाटो येथे नाईक यांच्या निवासस्थानी वास्तव्य करतात. मध्यरात्रीनंतर ही तरंगदेवता गावकरवाडा मयेतील देवी महामायाच्या मंदिरात दाखल झाल्यानंतर मयेतील देवी केळबाईची पेठ सजविली जाते. व नंतर माले प्रज्वलित केले जातात. नंतर सर्वात पुढे तरंगदेवता त्यांच्यामागोमाग पेठ व त्यांच्यामागे माले अशाप्रकारे सर्व देवता केळबाईवाडा मयेतील देवी केळबाईच्या मंदिराकडे दाखल होतात. येथे पेठ व तरंगदेवता एका जागी राहतात. तर देवीचे माले धोंडगणांच्या समवेत धोंडनृत्यासह फेरे मारतात असे या जत्रेचे स्वरूप असते. यावेळी भाविकांना ही जत्रा पाहण्याची संधी हुकणार आहे.
शिरगावच्या जत्रेविषयी सर्वांना कुतूहल, जत्रा व्हावी म्हणून देवीलाच साकडे
शिरगावातील देवी लईराईची जत्रा व्हावी अशी असंख्य धोंडगण व भाविक भक्तांची भावना आहे. सध्या सुरू असलेले लॉकडाऊन दि. 14 रोजी संपुष्टात येत असले तरी देशातील व राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची सरासरी व व्हायरसच्या संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन लॉकडाऊनचा काळ जर वाढविण्यात आला तर काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यासाठी आज लईराई देवीच्या असंख्य धोंडगण व भाविक भक्तजनांनी देवीलाच साकडे घातले असून लवकरच हे संकट टळून देवीचा उत्सव ठरलेल्या दिवशीच परंपरेप्रमाणे व्हावा, अशी देवीकडे मागणी केली आहे.
शिरगावच्या देवी श्री लईराईच्या जत्रेत देवीच्या प्रमुख कार्यात सहभागी होणाऱया चौगुले मानकरी धोंडगणांच्या सोवळय़ा व्रताला 9 दिवस अगोदर प्रारंभ होतो. तर देवीच्या श्रध्देने धोंड म्हणून देवीचे व्रत पाळणारे धोंडगण जत्रेपूर्वी पाच दिवस व तीन दिवस असे सोवळे व्रत पाळतात. या सर्व धोंडगणांना आपले सोवळे व्रत पाळण्याची संधी मिळावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे.