देशात कोरोना साथीचे संकट अधिक गडद झाले असून गुरुवारी रुग्णांची संख्या 77 झाली. रुग्णांची चाचणी करण्यासाठी देशभरातील 52 प्रयोगशाळांमध्ये 56 स्वतंत्र केंद्रे सुरू आहेत. 100 समन्वय केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम गुरुवारी पुन्हा एकदा शेअर बाजारावरही झाल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोरोना विषाणूला ‘महामारी’ घोषित, अमेरिकेने युरोपीय देशांमधील नागरिकांवर घातलेली बंदी आणि भारत सरकारने विदेशातून येणाऱया पर्यटकांचे व्हिसा काही मुदतीसाठी रद्दचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक पातळीवर सर्वच देशांच्या शेअर बाजारांवर याचा परिणाम जाणवला.
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नागरिकांनी घाबरून जावू नये, दक्षता घ्यावी. गर्दीची ठिकाणे टाळावीत, तसेच विदेशातील प्रवास टाळावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. इराणमध्ये अडकलेल्या सुमारे सहा हजार भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 13 आणि 15 मार्च रोजी विमान पाठविण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कोरोना साथीबाबत लोकसभेत माहिती देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, सर्व राज्यांमधून रुग्णसंख्या आणि उपचारांबाबत माहिती घेतली जात आहे. आरोग्य विभागासह विमानतळांवरही सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी देशभरातील 52 प्रयोगशाळांमध्ये 56 स्वतंत्र केंद्रे सुरू झाली आहे. 100 समन्वय केंद्रेही स्थापन आहेत. इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांची वैद्यकीय चाचणी तेथेच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी इराणमध्ये प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी भारताने साधन सामग्री पाठवली आहे. मात्र त्याला इराणच्या अबकारी विभागाने मंजुरी दिलेली नाही. इराणमधील नागरिकांना परत आणण्यासाठी शुक्रवारी रात्री विमान पाठविण्यात येईल.
कोरोनाची बाधा झाली नसलेल्यांना तत्काळ भारतात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 17 जानेवारीपासून सुरूवातीला 7 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कोरोनासंदर्भातील तपासणी करण्यात सुरूवात झाली. आता त्याची संख्या 30 केल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यत विविध विमानतळांवर विदेशातून आलेल्या 10 लाख 57 हजार 506 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व खासदारांनी कोरोना साथीबाबत आपल्या मतदारसंघामध्ये जागरुकता करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दिल्ली, केरळमध्ये प्रतिबंधक उपाययोजना
दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 31 मार्चपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चित्रपटगृह बंद ठेवण्यात यावेत, असे स्पष्ट केले आहे. केरळ सरकारनेही दिल्लीप्रमाणेच निर्णय घेतला असून शाळा, महाविद्यालये आणि सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरनेही शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली होती.
कोरोनाचा देशातील पहिला बळी कर्नाटकात
गुलबर्ग्यातील ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळेच ः आरोग्य खात्याकडून स्पष्टीकरण
बेंगळूर ः जीवघेण्या कोरोना व्हायरसने (कोविड-19) जगभरात धुमाकूळ घातलेला असतानाच भारतात गुलबर्गा येथील वृद्धाचा या व्हायरसमुळे बळी गेला आहे. तो कोरोनाचा देशातील पहिला बळी ठरला आहे. मोहम्मद हुसेन सिद्दिकी (वय 76) असे त्याचे नाव आहे. आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलू यांनी गुरुवारी रात्री याबाबतचे ट्विट केले आहे.
सिद्दिकीचा हैदराबादमध्ये बुधवारी मृत्यू झाला होता. तो कोरोनाचा संशयित रुग्ण होता. त्याचा मृत्यू अस्थमा आणि उच्च रक्तदाबामुळे मृत्यू झाला आहे. मात्र प्रयोगशाळेकडून याबाबतचा अहवाल आलेला नाही, असे मंत्री श्रीरामुलू यांनी गुलबर्गा येथे सांगितले होते. 29 फेब्रुवारी रोजी सिद्दिकी सौदी अरेबियाहून गुलबर्ग्याला परतला होता. 5 मार्च रोजी त्याला ताप, खोकला सुरू झाला. त्यामुळे खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. नंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे गुलबर्गा जिल्हा इस्पितळात विशेष कक्षात उपचार सुरू करण्यात आले होते. त्याच्या तोंडातील लाळ तपासणीसाठी बेंगळूरच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली होती.
तेथून अहवाल येण्यापूर्वीच कुटुंबीयांच्या इच्छेनुसार 9 मार्च रोजी त्याला उपचारासाठी हैदराबादमध्ये नेण्यात आले होते. 10 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला होता.
गुरुवारी सिद्दिकीला कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रयोगशाळेने अहवाल दिला आहे. त्यामुळे तो देशातील कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबीयांची गुलबर्गा जिल्हा इस्पितळात स्वतंत्र कक्षांमध्ये उपचार केले जात आहे.









