जिल्हाधिकाऱयांचे मुस्लीम बांधवांना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
बकरी-ईदचा सण कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करा. कोरोनाचे सर्व नियम पाळा, आपल्या घरातच प्रार्थना करा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी हे आवाहन केले आहे.
31 जुलै रोजी बकरी-ईदचा सण आहे. तो सण दरवषी मोठय़ा उत्साहाने साजरा होतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी हा सण कोरोनाचे नियम पाळत व शांततेत साजरा करावा. राज्य सरकारने कोरोनाबाबतची जी नियमावली दिली आहे, त्या नियमावलीचे पालन करत प्रत्येक मुस्लीम बांधवाने घरातच हा सण साजरा करावा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
शांतता भंग होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोरोनाचा सामना साऱयांनाच करावा लागत आहे. हे एक मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करताना संयम ठेवून सण किंवा इतर कार्यक्रम साजरे करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, मनपा आयुक्त के. एच. जगदीश, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









