प्रतिनिधी / मडगाव :
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱया हाऊसिंगबोर्ड न्यू वाडे-वास्को येथील श्रीमती वनिता नेरकर (55) हिचा काल गुरूवारी संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान बळी गेला. तर रात्री 8.20 वाजता झुवारीनगर वास्को येथील कृष्णाबाई लमाणी (67) हिचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या 20 झाली आहे.
वनिता नेरकर हिला कोरोनाची बाधा झाल्याने गेल्या काही दिवसांमागे कोविड हॉस्पिटलात आणले होते. तिची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात ठेवले होते. काल संध्याकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रात्री साडेआठच्या दरम्यान झुवारीनगर वास्को येथील कृष्णाबाई लमाणी हिचा बळी गेला. तिला मधुमेह, ह्य्दयविकार, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार होता. तिला 10 जुलै रोजी कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
कोविड हॉस्पिटलातून काल गुरुवारी दिवसभरात दोघांना डिस्चार्ज देण्यात आला तर एकूण 14 रूग्ण दाखल झाले आहेत.
एक्स-रे टेक्निशन पॉझिटिव्ह
मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये एक्स-रे टेक्निशन म्हणून काम करणारा नावेली येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याने कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला हाता. या पूर्वी कोविड हॉस्पिटलातील दोन डॉक्टर, तीन परिचारिका, एमटीएस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. या एक्स रे टेक्निशनने कोविड हॉस्पिटल सुरू झाल्यापासून एकही दिवस विश्रांती न घेता सेवा दिलेली होती. शेवटी त्यालाही कोरोनाची बाधा झाली.









