माहिती घेत असताना शीख तरुण पळाला
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका कार्यालयात कोरोनाची लक्षणे व ताप आलेले दोन रुग्ण निदर्शनास आले. यापैकी लक्षणे असलेल्या एका नागरिकाची रवानगी रुग्णालयात करण्यात आली आहे. ताप आलेला आणखी एक नागरिक पळून गेल्याची घटना निदर्शनास आली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्याने महापालिका कार्यालयात खळबळ माजली असून सर्वांचे लक्ष त्या नागरिकाच्या रिपोर्टकडे लागले आहे.
मनपा कार्यालयात येणाऱया नागरिकांची गर्दी वाढली आहे. परप्रांतियांना अर्ज भरण्याची सुविधा कार्यालय आवारात केल्याने थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून थर्मल मशीनद्वारे ये-जा करणाऱया प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. परप्रांतियांना स्वगृही पाठविण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू आहे. मात्र मंगळवारी ही प्रक्रिया बंद झाल्याने काही नागरिक चौकशीसाठी कार्यालयात येत आहेत. त्यामुळे त्यांची थर्मल तपासणी करून नंतरच कार्यालयात सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारी कार्यालयात आलेल्या एका शीख नागरिकाची थर्मल तपासणी केली असता त्याला ताप असल्याचे दिसून आले. थर्मल यंत्रावर तपासणीवेळी लाल दिवा लागला. त्यामुळे त्याची चौकशी करून मोबाईल क्रमांक घेण्यात आला. पुढील माहिती आरोग्य खात्याला देण्यासाठी बाजूला बसण्याची सूचना अधिकाऱयांनी केली. पण बाजूला न बसता तो पळून गेला. त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. त्याच्यासोबत आणखी चौघे जण होते. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱयांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
अधिकारी-कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण
थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करतेवेळी एका नागरिकाला सर्दी, ताप अशी विविध लक्षणे दिसून आली. ही लक्षणे कोरोना विषाणूची असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. पण गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्यासाठी सदर व्यक्ती महापालिका कार्यालयात फिरत असल्याने महापालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर व्यक्तीत कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खळबळ माजली आहे. त्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल आल्यानंतरच कोरोनाबाधित आहे का? याची माहिती उपलब्ध होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेकडो नागरिक महापालिका कार्यालयात आले होते. तो किती लोकांच्या संपर्कात आला याबाबतची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्याचा अहवाल आल्यानंतरच सर्वांची शंका दूर होणार आहे.









