प्रतिनिधी/ पणजी
सर्दी, तापाची लक्षणे दिसताच कोविड 19 ची तपासणी करून घ्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला केले आहे. कोविड – 19 मुळे दगावणाऱयांची संख्या वाढत आहे. कारण अनेकजण घाबरून तपासणी करण्यास तयार होत नाही. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना इस्पितळात आणले जाते, याबाबत डॉ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली आहे.
जनतेला उद्देशून सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे आपली मते व्यक्त केली. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी. कोरोनाची अनेकजणांनी धास्ती घेतली व तपासणीसाठी इस्पितळात येण्यास तयार होत नसतात आणि रुग्ण अस्वस्थ झाल्यावर इस्पितळात घेऊन येतात. यामध्ये अनेकजणांनी आपले प्राण गमावलेले आहे. त्यामुळे कोरोनाची जरादेखील लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्या. तसेच राज्यातील इस्पितळांमध्ये आवश्यक खाटांची सुविधा आहे. कोणीही याबाबत काळजी करू नये व रुग्णांना इस्पितळात दाखल करावे.
कोरोनाकडे साफ दुर्लक्ष करू नका. जेवढे दुर्लक्ष कराल तेवढा आजार बळावण्याची व फैलावण्याची भीतीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
राज्यात 14 जण सोमवारी कोरोनामुळे मरण पावले. आरोग्य खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार 14 पैकी तीन जणांना मरण पावल्यानंतर दक्षिण जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते, तर गोमेकॉमध्ये जे तीन रुग्ण दगावले त्यांना इस्पितळात दाखल केल्याच्या 24 तासात मृत्यू आला.
मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसताच स्वत:ला घरात कोंडून घेऊ नका तर स्वत: इस्पितळात येऊन तपासणी करून घ्या व उपचार करून घ्या. सरकारी इस्पितळांमध्ये आवश्यक अशा खाटा उपलब्ध आहेत. शिवाय आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना तपासणी यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. पॉझिटीव्ह असलेल्यांनी त्वरित इस्पितळात स्वत:ला दाखल करून घ्यावे, असेही मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले.









