- पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांची घोषणा
ऑनलाईन टीम / वेलिंगटन :
भारतात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचा धसका अन्य देशांनी देखील घेतला आहे. भारताच्या वाढत्या संसर्गामुळे न्यूझीलंडने भारतीयांना देशात प्रवेश बंदी केली आहे. ही प्रवेशबंदी अल्पकाळासाठी असणार आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांनी गुरुवारी याची घोषणा केली.

- न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही नियम लागू
पंतप्रधान जेसिंडा अडर्न म्हणाल्या, केवळ भारतीयांनाच नव्हे तर भारतात असणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांनाही देशात येण्यास मनाई असणार आहे. भारतात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळे 11 एप्रिल ते 28 एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे. या कालावधीत न्यूझीलंड सरकार रिस्क मॅनेजमेंट अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे जेसिंडा अडर्न यांनी यावेळी म्हटले आहे.









