प्रतिनिधी/कुरुंदवाड
कोरोनाची महामारी व समभाव्य महापूर ही दोन्ही संकटे आहेत कोरोनाची जाणीव व महापुराची जागृती आतापासूनच करणे आवश्यक आहे. यामध्ये लोकांचा सहभाग व सहकार्य पाहिजे पाणी घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला. महामारी आणि महापूर ही संकटे गंभीर असले तरी शासन खंबीर आहे पण दक्षता घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कोरोना महामारी व समभाव्य महापूर या दोन्हींची दक्षता म्हणून संयुक्त बैठक कुरुंदवाड नगरपालिकेत घेण्यात आली त्यावेळी खासदार माने बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते.
यावेळी खा. माने म्हणाले, शिरोळ तालुक्यात लॉकडाऊन काळात 67 परदेशी नागरिक आले आहेत. 3 मे नंतरच्या काळात पुणे – मुंबई येथून अंदाजे 2200 नागरिक तालुक्यात आले आहेत. नागरिकांनी स्वतः हुन कोरोनाची दक्षता घेणे आवश्यक आहे. गावकऱ्यांनी नियम पाळले नाहीत तर धोका वाढण्याची शक्यता आहे कोरोनाची लक्षणे दिसून येते नाहीत ती व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह असू शकते याचे भान नागरिकांनी ठेवावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर, उदय डांगे, सुनील चव्हाण, राजू आवळे,बापू जोंग,तुकाराम पवार आदींनी महापुरासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
यावेळी गट विकास अधिकारी शंकर कवितके , तालुका आरोग्य अधिकारी शैलेश दातार,मुख्याधिकारी निखिल जाधव,आरोग्य अधिकारी रेखा तराळ,पोलीस निरीक्षक चंद्रकांत नीरावडे तसेच यासह तेरवाड,औरवाड, बस्तवाड, अकिवाट, घोसरवाड आदी गावांचे सरपंच ,ग्रामसेवक उपस्थित होते
……अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे थैमान माजेल…!
यावेळी बोलताना माजी आमदार उल्लास पाटील म्हणाले, गतवर्षीच्या महापुराने सर्वसामान्याबरोबर शेतीच्या नुकसानीची शेतकरी उध्वस्त झाला प्रशासनाच्या गाफील पणामुळे ही वेळ त्याच्यावर आली आता कोरोना पाठोपाठ यंदा महापूर आला तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्येचे थैमान माजेल असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी दिला.








