ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांमधील समन्वय महत्वाचा असून मृत्यूदर कमी करणे, कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे तसेच इतर आजार असणा-या व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक यांना वेळीच ओळखून त्यांची आरोग्य तपासणी व उपचार करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. घाबरु नका शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राज्यमंत्री भरणे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एकत्रित इंदापूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेला गती देणे आवश्यक असून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना प्रतिबंधासाठी आपल्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थितपणे पार पाडावी. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु या, असे सांगून इंदापूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.