जिल्हाधिकाऱयांचे स्पष्टीकरण, अफवेमुळे एकच खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात व जिल्हय़ामध्ये कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी नागरिकांना केले आहे. परदेशातून बेळगावात 9 जण आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र सोशल मीडियावर तसेच वृत्तवाहिन्यांवर याबाबत 9 संशयित रुग्ण असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे जिल्हय़ात एकच खळबळ उडाली. मात्र या 9 जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे वैद्यकीय निदानात स्पष्ट झाले आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
चीनसह इतर देशांमध्ये कोरोना व्हायरचा प्रभाव वाढला आहे. इतर देशामधून आतापर्यंत बेळगावात 9 जण परतले आहेत. त्या परतलेल्या प्रवाशांची सोमवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामधील दोघांच्या प्रकृतीवर तर 28 दिवसांपासूनच देखरेख ठेवण्यात आली होती. आतापर्यंत कोणालाही नजरकैदेत ठेवण्यात आले नाही. मात्र याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींच्या कुटुंबीयांना तसेच इतरांना सतर्क करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यातर्फे बाहेरुन येणाऱया प्रवाशांवर नजर ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास संबंधितांनी आरोग्य खात्याकडे संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. सांबरा विमातळाच्या अधिकाऱयांना याबाबत कळविण्यात आले आहे. परदेशातून कोणताही प्रवासी आला तर तातडीने त्याबाबत माहिती आरोग्य विभागाला कळवावी, असे सांगण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसबाबत सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. हा आजार रोखण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यानेही सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले आहे. बेळगावात 9 संशयित रुग्ण आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच भितीचे वातावरण पसरले होते. मात्र या सर्वांची चाचणी पूर्ण झाली असून त्यांना कोरोना व्हायरस न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.









