माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मत
हरमल/ वार्ताहर
कोरोनाची भीती वाढत असली तरी कोरोनाला घेऊनच वाटचाल करण्याची गरज सध्या वाटू लागली आहे. कोरोनाचा बाऊ करून विध्यार्थ्यांच्या भवितव्याकडे दुर्लक्षून चालणारे नाही व सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्याप्रति पालकांची काळजी हेलावून टाकणारी असल्याने सरकारने विनाविलंब निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन व राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले.
सध्या राज्यात शाळ सुरू करण्याच्याबाबतीत अनेक शिक्षणतज्ञ, पालक संघटना व राजकीय पक्षाचे नेते मतप्रदर्शन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशी हायस्कूलने दहावीचे व बारावीचे वर्ग सुरू केले होते. त्याविषयी अनुभव व मत जाणून घेण्याचा प्रस्तुत प्रतिनिधींनी संपर्क साधला. सरकारने शाळा व्यवस्थापन मंडळास निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. परंतु पालक शिक्षक संघटना व राजकीय नेते आदींच्या मतमताचा कानोसा घेता, शाळा व्यवस्थापन समिती दबावाखाली वावरत आहे. गोव्यातील नियोजन व सांख्यीकी खात्याची आकडेवारी पाहता, तसेच सरकारी अटी व नियमांचे पालन करून टप्याटप्याने एक -एक वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खरे म्हणजे सांख्यीकी खात्याची आकडेवारी शिक्षण तज्ञांच्या व संघटनांच्या डोळय़ात अंजन घालणारी असल्याचे आपले स्पष्ट मत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात 6404 मृत्यू झाले व 2019 शी तुलना करता, मृत्यदर 229 नी कमी आहे. याचा अर्थ कोरोना व अन्य मृत्य बाबतीत गोवा सुरक्षित असल्याचा खात्याचा दावा आहे हे सिद्ध होते.
नियमांचे पालन करुन वर्ग सुरु
हरमल पंचक्रोशी संस्थेने दहावीचे व बारावीचे वर्ग सुरू केले म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न नसून त्यांच्या जीवांची पूर्ण काळजी व उज्ज्वल भविष्यासाठी शाळा वर्ग सुरू केले आहेत. गेल्या महिनाभरात आपल्या संस्थेने सुयोग्य पद्धतीने नियमांचे पालन करून तसेच विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देत ‘सजग’ बनविले आहे. विद्यार्थी गरम पाणी, घराकडून टिफिन आणून वर्गात बसून खाणे पसंत करतो. प्रसाधन कक्षात जाताना नियमांचे पालन तसेच निर्जंतुकीकरण करणे आदी सोय संस्थेने केली आहे. तालुक्मयातील अन्य शाळांपेक्षा हरमल पंचक्रोशीत दहावीच्या वर्गात 74 विद्यार्थी असून त्यांची काळजी घेणे संस्थेचे प्रथम कर्तव्य आहे. पालक शिक्षक संघाने कार्यप्रवण होणे अत्यावश्यक असून कोरोनाच्या साथीने जगण्याची उमेद बाळगणे गरजेचे आहे.
संकटांवर उपाययोजना करुन शिक्षणप्रक्रिया पुढे नेणे गरजेचे
राज्यातील एखाद्या राजकीय नेत्याने वा संघटनेने हरमल पंचक्रोशीस आकस्मिक भेट देऊन पाहणी करण्याचे आवाहनही चेअरमन पार्सेकर यांनी केले आहे. प्रत्येक संकटाशी मुकाबला करून त्यावर उपाययोजना काढून, शिक्षणप्रक्रिया पुढे नेणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी थांबून उपयोगाचे नाही. शाळा व्यवस्थापन मंडळांनी आवश्यक घटकांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी व त्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या शिक्षण मंडळांनी एक-दोन वर्ग सुरू केले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा एखाद्या तज्ञाने करावी हे योग्य नव्हे, असे पार्सेकर म्हणाले. जे लोक टीका करण्यात धन्यता मानतात त्याना समजावण्याचा आपला प्रयत्न नसून, शिक्षण संस्थांनी समजूतदारपणा व विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी पावले उचलावीत अशी आपली शिक्षक या नात्याने भूमिका आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले. विद्यार्थी घरी राहून कंटाळलेले तर शिक्षकांना शिकवणीपेक्षा जादा काम अशी स्थिती झाली आहे. प्रत्यक्षात वर्गात विध्यार्थ्यांना शिकवून जो परमानंद शिक्षक अनुभवत असतो, त्यास ऑनलाइन हा पर्याय असूच शकत नाही, असे आपले स्पष्ट मत आहे. त्यासाठी दिवसांआड वर्ग घेण्याची तसेच ऑनलाइन वर्ग चालू असताना उद्भवलेल्या अवघड समस्येची उजळणी आदी असे पर्याय व प्रयोग, शाळा व्यवस्थापन मंडळाने करण्यास हरकत नाही, असे चेअरमन पार्सेकर यांनी व्यक्त केले.
दीनदयाळ स्वास्थ्य योजनांची त्वरित अंमलबजावणी आवश्यक
गोवा सरकारने कोरोनाचा अंतर्भाव दीनदयाळ स्वास्थ्य योजनेत केल्याने गोवेकरांनी आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे. आपल्याच कार्यकाळात आरोग्यमंत्री असताना डीडीएसवाय योजना तयार होती व मुख्यमंत्री बनल्यानंतर अर्थसंकल्पात तरतूद करून चालीस लावली त्याचे समाधान आहे. त्यावेळेस या योजनेत 447 विविध व्याधींचा समावेश होता. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा अंतर्भाव केला हे सामान्य नागरिकांच्या हिताचे ठरले आहे. गोव्यात डीडीएसवाय अंतर्गत तीन व चार लाख रुपयांचा विमा प्रत्येक कुटुंबासाठी लागू केलेला आहे. कोरोनाचा अंतर्भाव व खासगी इस्पितळासाठी 94 हजारांचे पॅकेज लागू केले आहे. त्याची अंमलबजावणी त्वरित लागू करावी व आवश्यक बदल तद्नंतरच्या काळात लागू करावेत, असे मत पार्सेकर यांनी व्यक्त केले.
राज्यातील लोकांनी सरकारी नियमांचे पालन करताना, स्वतःची काळजी घेऊन कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी जनतेला आवाहन केले.









