निकाल 10 टक्क्यांनी कमी : 25 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षाच टाळली : अनुपस्थितीतही वाढ
अमेरिकेत कोरोनामुळे शिक्षणाशी संबंधित स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शिक्षणाशी संबंधित संस्था एनडब्ल्यूईएने केलेल्या सर्वेक्षणात इयत्ता पहिली ते 8 वीच्या पर्यंतच्या मुलांची शिकण्याची क्षमता अत्यंत वाईट प्रकारे प्रभावित झाल्याचे दिसून आले आहे.
संस्थेने अमेरिकेतील तिसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गात शिकणाऱया 44 लाख मुलांचे मूल्यांकन केले आहे. मुले सर्वाधिक गणितात पिछाडली गेली आहेत. 2019 च्या तुलनेत यंदा 25 टक्के मुलांनी परीक्षाच दिलेली नाही. बहुतांश जिल्हय़ांमध्ये लहान मुलांची अनुपस्थिती वाढली आहे. 2020 मध्ये परीक्षेस बसलेल्या मुलांचा निकाल 2019 च्या तुलनेत खराब राहिला आहे. गणिताचा निकाल 10 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती संस्थेचे संशोधक मेगन कुफेल्ड यांनी दिली आहे.
वाचन-लिखाणची क्षमता कालौधात सुधारत असली तरीही गणितात मुलांना प्रारंभिक काळात अडचणी आल्या तर त्या भविष्यातही कायम राहतात. मुलांच्या मनात गणितासंबंधी भीती निर्माण होण्याचीही शक्यता असते. अमेरिकेत इंग्रजी ही प्रमुख भाषा असल्याने याचा निकाल 2019 प्रमाणेच लागला आहे. सर्वसाधारपणे जे विद्यार्थी 1.5 ग्रेडने मागे राहायचे ते आता दोन ग्रेडने मागे पडले आहेत. पुन्हा एकदा मूलभूत अभ्यासक्रम आणि गणितातील प्राविण्य वाढविण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे उद्गार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस मिशिन यांनी काढले आहेत.
अश्वेत, गरीब मुलांना फटका
रेनेसां नावाच्या संस्थेने पहिली ते 8 वीपर्यंतच्या 50 लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे. कोविडमुळे मुलांचे शिक्षण 12 आठवडय़ांच्या विलंबाने सुरू आहे. सर्वाधिक प्रभाव बिगरश्वेतवर्णीय मुलांवर पडला आहे. यात आफ्रिकन, हिस्पॅनिक आणि भारतीय वंशाची मुलेही सामील असल्याचे संस्थेच्या अहवालात म्हटले गेले आहे. मंदगतीच्या इंटरनेटमुळे मुलांना त्रास होत असल्याचे कॅलिफोर्नियाच्या सेंटर जोकिन जिल्हय़ातील सहाय्यक पर्यवक्षेक आंद्रे पेसिना यांनी म्हटले आहे.









