कोरोनाच्या फैलावाने पुन्हा पकडला वेग, देशात गेल्या 24 तासात 39,726 बाधितांची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील एक वर्षांहून अधिक काळापासून जगभरात थैमान घालत असलेला कोरोना संसर्ग मध्यंतरी आटोक्मयात आला होता. मात्र कोरोना संसर्गाने आता पुन्हा डोके वर काढले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बाधितांमध्ये सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासात तब्बल 39 हजार 726 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 2021 या वर्षातील एक दिवसातील ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे. या आकडेवारीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 इतकी झाली आहे. नव्या बाधितांमुळे सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ होत असून हा आकडा 2 लाख 71 हजारांवर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात 154 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या 1 लाख 59 हजार 370 झाली आहे. भारतात सध्या 2 लाख 71 हजार 282 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 कोटी 10 लाख 83 हजार 679 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. शुक्रवारपर्यंत 3 कोटी 93 लाख 39 हजार 817 जणांना कोरोनाविरोधी लस टोचली आहे. लस घेणाऱयांमध्ये वाढ झाली असली तरी अद्याप नव्या बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढताना दिसत आहे.
वाढत्या संसर्गामुळे नियमावली कडक
देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे फर्मान काढले आहे. पंजाबमध्ये 31 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद केली आहेत. तसेच ‘लॉकडाऊन’चे संकेतही देण्यात आले आहेत. गुजरातमधील अहमदाबादमध्ये मॉल्स आणि मल्टिप्लेक्स बंद ठेवण्यात आली आहेत. कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही नियमावली कडक करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.
जगभरात पुन्हा चिंतेचे ढग
रुग्णवाढीचा दर जगभरात मागच्या वषीपेक्षा वाढला आहे. मात्र मृत्यूदर घटल्याने अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा 25 लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या जगभरात 12 कोटी 24 लाखांहून अधिक रुग्ण असून त्यापैकी 9 कोटी 87 लाख 25 हजार 789 रुग्ण बरे झाले आहेत.









