तज्ञांचा इशारा : काळजी घेतली नाही तर कर्नाटकात दिल्लीची पुनरावृत्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव सध्या नियंत्रणात आला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळला नाही. थंडीत काळजी घेतली नाही तर नवी दिल्लीप्रमाणेच कर्नाटकातही रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे.
यासंबंधी अनेक तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना इशारा दिला आहे. कर्नाटकात तपासणी वाढविल्यामुळे वेळीच कोरोनाचे निदान होऊ लागले आहे. त्यामुळे बाधितांवर वेळेत उपचार सुरू आहेत. म्हणून मृत्यूचे प्रमाण घटले आहे आणि कोरोनाचा फैलावही आटोक्मयात येत आहे.
फैलाव आटोक्मयात आला आहे म्हणून दुर्लक्ष केल्यास थंडीत फैलाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे गाफील राहू नका. नियमांचे पालन केले नाही तर नवी दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी दिला आहे. थंडीत प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतर राखले तरच यावर नियंत्रण मिळवता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव शहर व जिह्यातही कोरोना रुग्णसंख्येत घटत होत चालली आहे. किमान 100 ते 250 च्या घरात रोज नवे रुग्ण आढळून येत होते. आता ही संख्या 50 च्या आत आली आहे. कोरोना नियंत्रणात आहे म्हणून नागरिकांनी नियम मोडू नये, असे आवाहन वारंवार करूनही दसरा-दिवाळीत नागरिकांनी नियमांची पायमल्ली केली आहे.
बेळगावात 2400 जणांची तपासणी
17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने प्राध्यापक व कर्मचाऱयांची कोरोना तपासणी हाती घेतली आहे. यानुसार आतापर्यंत एका बेळगावात 2400 जणांची तपासणी झाली असून शुक्रवारपासून तपासणी अहवाल येणार आहेत. आता कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठ व विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातही कोरोना तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी दिली.









