राज्यात 9 नवे रुग्ण : संसर्गबाधितांची संख्या 512 वर : 193 जण संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा कहर कमी होत असून सोमवारी 9 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 512 जण कोरोनाबाधित आढळले असून 193 जण संसर्गमुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत विजापूर, बागलकोट, मंडय़ा, मंगळूर जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 2 आणि बेंगळूर शहर जिल्हय़ात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर गुलबर्ग्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बेंगळूरमधील एका रुग्णाने इस्पितळाच्या तिसऱया मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
राज्यातील चार जिल्हे कोरोनामुक्त झाले असतानाच बेंगळूर, म्हैसूर, बागलकोट, विजापूर या जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गुलबर्ग्यात कोरोनामुळे 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तो मूळचा आळंद येथील रहिवासी होता. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 झाली आहे. सोलापूर प्रवासादरम्यान या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. श्वसनात अडथळे येऊ लागल्याने तो जिल्हा इस्पितळात दाखल झाला होता. 22 एप्रिल रोजी त्याला कोरोनाचे निदान झाले होते. मूत्रपिंडे अकार्यक्षम असल्याने त्याच्यावरील उपचार यशस्वी झाले नाहीत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ट्विटरवर दिली. बेंगळूर शहरात 13 वर्षीय बालकही संसर्गबाधित आढळून आला आहे.
विजापूरमध्ये आणखी दोघांची भर
विजापूर जिल्हय़ात 45 वर्षीय व्यक्तीला रुग्ण क्रमांक 221 च्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची बाधा झाली आहे. तर 27 वर्षीय युवकालाही संसर्ग झाला आहे. त्याला संसर्ग होण्याचे कारण शोधण्यात येत आहे. या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 41 वर पोहोचली आहे. मंगळूरमध्ये 45 वर्षीय पुरुष आणि 80 वर्षीय वृद्धेला कुटुंबातील व्यक्तीमुळे संसर्ग झाला आहे. ते दोघेही एकाच कुटुंबातील आहेत.
मंडय़ा जिल्हय़ातील नागमंगल तालुक्याच्या सातेनहळ्ळी येथील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती 22 एप्रिल रोजी मुंबईहून परतला होता. स्थानिकांनी या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे माहिती दिल्यानंतर त्याचे स्वॅब 25 एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची पत्नी, मुलगा, मेहूण्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच जिल्हय़ातील मळवळ्ळी तालुक्यातील रुग्णालाही कुटुंबातील व्यक्तीमुळे संसर्ग झाला आहे.
बेंगळूरमध्ये रुग्णाची आत्महत्या
बेंगळूरच्या व्हिक्टोरिया इस्पितळात 24 मार्च रोजी 50 वर्षीय व्यक्ती उपचारासाठी दाखल झाली होती. त्याच्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर तिसऱया मजल्यावरील विशेष वॉर्डात हलविण्यात आले. याच वॉर्डातील 45 वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या भीतीमुळे 50 वर्षीय इसमाने भीतीमुळे इमर्जन्सी विन्डोमधून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याची मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्यामुळे त्याची डायलिसिस करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.









