कोरोना संक्रमण फैलावल्यापासून अमेरिकेच्या स्टुडंट म्युझिक ग्रूपवर अत्यंत नकारात्मक प्रभाव पडला आहे. शाळांमध्ये संगीताचे धडे गिरविणाऱया मुलांचे वर्ग बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी घरात महागडी वाद्ये उपलब्ध झाली नाहीत. तर विद्यापीठांमध्ये संगीताचे शिक्षण सुरू असले तरीही ते ऑनलाईन उपलब्ध झाल्याने त्याचा विशेष लाभ होऊ शकलेला नाही.
परंतु आता विद्यार्थी आणि विविध स्टुडंट बँड्सनी पुन्हा सराव सुरू केला आहे. तेथे विविध प्रकारच्या संशोधनानंतर अनेक उपाय शोधण्यात आले आहेत. ट्रम्पेट, वुडविंड यासारख्या तोंडाने वाजविणाऱया वाद्यांच्या बाहेरील हिस्स्याला नायलॉनच्या कापडाने झाकून वाजविण्यात येत आहे. तसेच त्यांना पातळ प्लास्टिकनेही आच्छादण्यात येत आहे. याचबरोबर या वाद्यांना हाताळणारे लोक चुंबकयुक्त विशेष मास्क परिधान करत आहेत. ज्यात पुढील बाजूला खुली जागा असून वाद्य हटताच ते बंद होत आहे. हा समूह 6 फूटांच्या ‘हूला हूप्स’मध्ये बसून सराव करतो. पाण्याच्या पाईपने हा हूला हूप्स तयार करण्यात आला आहे.









