मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीसाठी काल सोमवारी विक्रमी मतदान झाले. याबद्दल गोमंतकीय नागरिक, निवडणूक आयोग, सुरक्षा आणि पोलिस यंत्रणा, इतर संबधित सरकारी खाती तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचे आम्ही आभारी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गेले तीन महिन्यांपासून या सर्व यंत्रणा निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होत्या. आज त्या निर्विघ्नपणे पार पडल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्याने एका विशि÷ मर्यादेत तसेच नियमावलीत राहून त्या घेण्यात निवडणूक आयोगाला यश आले. राजकीय पक्षांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. तसेच सर्व सामान्य नागरिकांची साथ मिळाली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांचेही योगदान महत्त्वाचे होते. या सर्वांमध्ये दुवा साधण्याचे काम सर्व प्रसारमाध्यमांनी चोखपणे बजावले. याबद्दल या सर्वांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली मेहनत आणि सत्ताधारी पक्ष या नात्याने राज्य सरकारने उपसलेले कष्ट याचे फळ आज मिळाले. याची प्रचिती आज गोमंतकीय नागरिकांनी भरभरुन केलेल्या मतदानातून आली, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे








