डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजींचे गौरवोद्गार : पोस्ट विभागातर्फे कर्मचाऱयांचा सन्मान
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाकाळात ज्यावेळी लोक घरातूनही बाहेर पडत नव्हते, त्याकाळात पोस्ट कर्मचारी घरोघरी जाऊन सेवा देत होते. पोस्ट कर्मचाऱयांमुळेच अनेक वृद्धांना वेळेत पेन्शन मिळू शकली. याचबरोबर पोस्ट खात्याने केलेले कार्य कौतुकास्पद असून यापुढेही त्यांनी अशीच सेवा द्यावी, असे गौरवोद्गार रूद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी काढले.
बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने विभागीय स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रम मंगळवारी एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते. व्यासपीठावर धारवाड पोस्ट विभागाचे पोस्टमास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार, बेळगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक एच. बी. हसबी उपस्थित होते.
व्हीटीयू पोस्ट ऑफिस राज्यात तिसरे
व्हीटीयू येथील पोस्ट ऑफिस हे स्पीड पोस्ट वितरणामध्ये राज्यात तिसऱया क्रमांकावर आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये बेळगाव पोस्ट विभागाने तिसरा क्रमांक मिळविला. याचबरोबर शहापूर पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱयांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. एम. के. कोत्तल यांनी स्वागत केले. एच. बी. हसबी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बेळगाव, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर येथील पोस्ट कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमात 88 पुरस्कारांचे वितरण
पोस्ट विभागाने मागील वर्षभरात उत्तम कामगिरी केली आहे. सावरीन गोल्ड बॉण्ड वितरणामध्ये देशात अव्वल क्रमांक बेळगाव विभागाने मिळविला आहे. याचबरोबर विविध सेवांमध्येही बेळगाव विभागाने आपले स्थान बळकट केले. या कामगिरीमध्ये योगदान दिलेले कर्मचारी व विभाग यांना 88 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्स, आधार नोंदणी, सेव्हिंग अकाऊंट सुरू करणे, सावरीन गोल्ड बाँण्ड या विविध योजनांसाठी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.









