वॉशिंग्टन
कोरोना विषाणू संसर्गामुळे जग ठप्प झाल्यामुळे अनेक उद्योगधंदेही ठप्प झाले होते. आर्थिक स्तरावर संपूर्ण जग संघर्ष करत असतानाच अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मार्च-2020 मध्ये संपूर्ण जगभरात कोरोना पसरल्यानंतर अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये एक ट्रिलीयन डॉलरहून अधिक संपत्तीची वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, अमेरिकेच्या अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली आहे. अमेरिकेतील 650 अब्जाधीशांना मार्च 2020 आणि नोव्हेंबर 2020 च्या दरम्यान 1.008 ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती प्राप्त झाली आहे. या सगळय़ांची एकूण संपत्ती चार ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. या समूहातील 29 अब्जाधीशाची संपत्ती मार्चपासून दुप्पट झाली आहे. तसेच नवे 36 अब्जाधीश यादीत समाविष्ट झाले आहेत.
एलॉन मस्क सर्वात श्रीमंत
‘इन्स्टिटय़ूट फॉर पॉलिसी स्टडीज’च्या अहवालानुसार, सर्वात श्रीमंत असलेल्या एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये महामारीनंतर अब्जावधी डॉलरची वृद्धी झाली आहे. 18 मार्चला त्यांच्याजवळ 54.7 अब्ज डॉलर होते तर 17 नोव्हेंबरपर्यंत वाढून 126 अब्ज डॉलर झाले. त्यांच्या संपत्तीत बहुतांश वृद्धी टेस्ला स्टॉकमुळे झाली आहे. साहजिकच सध्या ते मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षाही श्रीमंत झाले आहेत. त्याचबरोबर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत 47 टक्क्यांची वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून आले.









