डीआरडीओच्या औषधाने संसर्गाची तीव्रता कमी होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान शनिवारी एक दिलासाजनक वृत्त समोर आले आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कोरोनावरील उपचारासाठी एका औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इन्स्टीटय़ूट ऑफ न्युक्लियर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेन्स (आयएनएमएएस) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने (सीसीएमबी) मिळून तयार केले आहे. या औषधाला सध्या 2-डीओक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) नाव देण्यात आले असून याच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजला देण्यात आली आहे.
औषधाचे वैद्यकीय परीक्षण यशस्वी ठरले आहे. औषधांचा वापर झालेल्या रुग्णांची प्रकृती वेगाने सुधारली आहे. तसेच रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरताही कमी झाली आहे. औषधाच्या वापरामुळे रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उर्वरित रुग्णांच्या तुलनेत लवकरच निगेटिव्ह होत असल्याचा दावा आहे.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल 2020 मध्ये प्रयोगशाळेत या औषधावर प्रयोग केले होते. हे औषध कोरोना विषाणू रोखण्यास मदत करत असल्याचे दिसून आले होते. याच्याच आधारावर डीसीजीआयने मे 2020 मध्ये दुसऱया टप्प्यातील परीक्षण करण्यास मंजुरी दिली होती.
देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाचे परीक्षण करण्यात आले आहे. दुसऱया टप्प्यातील परीक्षण मे-ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते. तिसऱया टप्प्यातील परीक्षण डिसेंबर 2020 पासून मार्च 2021 पर्यंत देशभरातील 27 रुग्णालयांमध्ये करण्यात आले आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूत हे परीक्षण पार पडले आहे. 2-डीजी औषध देण्यात आलेल्या 42 टक्के रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरता तिसऱयाच दिवशी संपली आहे. हाच निष्कर्ष 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांबाबतही दिसून आला आहे.
औषधाचे कार्यस्वरुप
हे औषध पावडरच्या स्वरुपात असून ते पाण्यात मिसळून दिले जाते. हे औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी प्रॉडक्शन करून विषाणूची वाढ रोखते. हे औषध विषाणूने संक्रमित पेशींची ओळख पटवत असल्याने ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते. औषधामुळे रुग्णाला अधिक दिवस रुग्णालयात रहावे लागणार नसल्याचाही दावा करण्यात येत आहे.









