सात महिन्यानंतर रेल्वे पुन्हा सुरू
प्रतिनिधी / कुडाळ:
कोकण रेल्वे मार्गावरील कोसळलेल्या पेडणे बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-सांगलीमार्गे वळविलेल्या नेत्रावती एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, दुरान्तो एक्स्प्रेस, त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरून पुन्हा सुरू केल्यानंतर आता मडगाव-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेस 2 ऑक्टोबरपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बंद करण्यात आलेली ही रेल्वे सात महिन्यानंतर सुरू करण्यात आली.
हजरतनिजामुद्दीन-मडगाव (02414) ही सुपरफास्ट रेल्वे 2 ऑक्टोबरपासून सुरू होत असून सकाळी 11.35 वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटून दुसऱया दिवशी दुपारी 2.20 वाजता मडगावला पोहोचणार आहे. शुक्रवार-शनिवार ही रेल्वे धावणार आहे. तर मडगाव-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट मडगावहून 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सुटून हजरत निजामुद्दीनला दुसऱया दिवशी सायंकाळी 4.45 वाजता पोहोचणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. कोटा, वडोदरा, सूरत, पनवेल, रत्नागिरी असे थांबे या रेल्वेला आहेत. सिंधुदुर्गात या रेल्वेला थांबा नाही.
एक नोव्हेंबरपासून नॉनमान्सून वेळापत्रक
राजधानी सुपरफास्ट रेल्वे एक नोव्हेंबरपासून नॉनमान्सून वेळापत्रकानुसार धावेल. हजरत निजामुद्दीनहून सकाळी 11.35 वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी 12.50 वाजता मडगावला पोहोचेल. तर मडगाव-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगावहून 10.30 वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी 12.40 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचणार आहे.
कुडाळ, थिवीम, वसई थांबे रद्द
मडगाव राजधानी एक्स्प्रेसला यापूर्वी कुडाळ, थिवीम (गोवा) व वसई (मुंबई) येथेही थांबे होते. मात्र, आता हे तिन्ही थांबे रद्द करण्यात आले आहेत. ही कोविड स्पेशल ट्रेन असल्याने थांबे रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी कोकण रेल्वे मार्गावरून परत सुरू केलेल्या त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेसला असलेले सावंतवाडी व रत्नागिरी हे थांबे रद्द करण्यात आले आहेत.









