वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूरमधील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजमध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय विभागामार्फत ‘एक भारत श्रेष्ट भारत अभियानाअंतर्गत उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
युवकांचे व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रनिर्माण हा उद्देश ठेवून सुरु असलेल्या या अभियानासाठी प्रोसाहन देण्याकरता श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे औषधनिर्माण महाविदयालयात उत्तर ओरिसा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १० विद्यार्थी व प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. परेशचंद्र धार, प्रा. क्रांतिराणी नाईक व त्यांचे सोबत आलेले शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्रॅम ऑफिसर डॉ. डी. के. गायकवाड यांनी टीम सोबत भेट दिली. सदरच्या भेटीदरम्यान ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर या पवित्र स्थळासंबधी, खाद्य संस्कृती, कला संस्कृती, भाषासंस्कृती याची माहिती विद्यार्थ्यांनी व प्रा. परेशचंद्र धार व प्रा. क्रांतिराणी नाईक यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील व कोल्हापूर जिल्यातील ऐतिहासिक, शिक्षण, खाद्य परंपरेची माहिती तात्यासाहेब कोरे औषधनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी वारणा परिसर व शिक्षण संकुला मध्ये सर्वांचे स्वागत केले व वारणेच्या जडण-घडणेची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन राट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. ए. एस. शेरीकर, प्रा. सुप्रीया गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे (सावकर) तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.