वृत्तसंस्था/ सेऊल
जागतिक व्यावसायिक गोल्फ क्षेत्रामध्ये सर्वाधिक बक्षीस रक्कमेची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया कोरियन गोल्फ स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या पार्क हेयुन केयुंगने जेतेपद पटकाविले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनासाठी केलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत खेळाडूंच्या शारीरिक सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत ही स्पर्धा यशस्वी करण्यात आली. कोरियन एलपीजीए गोल्फ स्पर्धेत जगातील पहिल्या दहा महिला गोल्फपटूमधील तीन गोल्फपटूचा यामध्ये समावेश होता. या स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क कोरियाने यापूर्वीच अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना विकले आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एलपीजीए गोल्फ स्पर्धा तहकूब करण्यात आल्या होत्या. तब्बल तीन महिन्यानंतर कोरियात ही गोल्फ स्पर्धा पहिल्यांदा भरविली गेली.
विजेती पार्क केयुंगने या जेतेपदाबरोबरच 180,000 डॉलर्सचे बक्षीस पटकाविले. तिने या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत 5-अंडर-पार 67 गुण नोंदविले. या स्पर्धेत बेई वू 68 गुणांसह दुसऱया तर लिम जियांग 71 गुणांसह तिसऱया स्थानावर राहिली.









