पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग
प्रतिनिधी/ नवारस्ता
गेल्या चोवीस तासांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात प्रतिसेकंद 17 हजार 256 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. परिणामी कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात चोवीस तासांत दोन टीएमसी वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळनंतरही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता.
कोयना पाणलोट क्षेत्राला दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढायला सुरवात केली आहे. पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे पाणलोट क्षेत्रातून प्रतिसेकंद 17 हजार 256 क्युसेक पाण्याची आवक कोयना जलाशयात सुरू झाली असल्याने धरणात दोन टीएमसी इतक्या पाण्याची वाढ झाली आहे.
सोमवारी सायंकाळी पाच ते मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे 79 (586) मिलिमीटर, नवजा येथे 117 (727) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 144 (710) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 16.45 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान पाटण सह संपूर्ण तालुक्याला मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
सातारा जिह्यात रेड अलर्ट..!
हवामान खात्याने राज्यातील पाच जिह्यांना रेड अलर्ट जारी केला असून यामध्ये
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिह्यांचा समावेश आहे. यापूर्वी या जिह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र येत्या 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी झाला असल्याने येत्या चार दिवसांत या जिह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कराडला पावसाचा जोर वाढला
गेले आठवडाभर हुलकावणी देत असलेल्या पावसाचा मंगळवारी पहाटेपासून जोर वाढला आहे. कराड शहरासह तालुक्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. कधी मुसळधार तर कधी हलक्या सरींनी पावसाला सुरूवात झाली. दरम्यान कराडच्या कोल्हापूर नाका, सेवारस्त्यासह पोपटभाई पेट्रोलपंप चौक, उपजिल्हा रूग्णालय परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. अगोदरच पाईपलाईनच्या कामासाठी खोदकाम सुरू असल्याने सेवारस्त्यावरून वाहने चालवणे अडचणीच बनले होते. वाखाण भागातील रस्त्यावरही वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. तालुक्यात शेतीच्या कामांना वेग आला असून बहुतांशी पेरण्या अंतिम टप्प्यात असल्याने शेतकरी सुखावले.
सातारा शहरात पावसाची रिपरिप
जुलै महिन्यापासुन पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सातारा शहरात मंगळवारी सकाळपासुन पावसाची रिपरिप सुरू होती, पण म्हणावा तितका जोरदार असा पाऊस अद्याप काही सुरू झाला नाही. जुलै महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हय़ात सरासरी 47.1 इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वर येथे झाला असून एकूण 260 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पावसाची नोंद ही खटाव, वडूज भागात आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पुन्हा एकदा नद्यांच्या व धरणांच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच जिल्हय़ातील अनेक ठिकाणचे धबधबे, झरे जोमाने वाहू लागले आहेत.








