एक लाखासाठी अंगणवाडी सेविकेच्या पतीला ठार मारण्याची धमकी
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना विभागातील वाजेगाव (ता. पाटण) येथील एका अंगणवाडी सेविकेला 1 लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोयना पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत कोयना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 31 जानेवारी रोजी कोयना विभागातील वाजेगाव येथील अंगणवाडी सेविका राजश्री धोंडिबा मोहिते (वय 31) यांना एक निनावी फोन आला. या निनावी फोनवर अज्ञात इसमाने एक लाख रुपयांची मागणी करून आपली मागणी पूर्ण न केल्यास त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या संशयित आरोपींनी अंगणवाडी सेविकेला पैसे घेऊन पाटण एसटी बसस्थानक परिसरात बोलावले होते. दरम्यान, अंगणवाडी सेविकेने या घटनेने भयभीत होऊन कोयना पोलिसांत तक्रार दिली.
कोयना पोलिसांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एम. भावीकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पाटण एसटी बसस्थानक परिसरात सापळा रचला. धमकी देणाऱया संशयित राहुल जयसिंग देसाई (वय 31 रा. येराडवाडी, ता पाटण), युवराज बाबू जाधव (वय 21) आणि देवानंद दिनकर वायकर (वय 20, रा. येराड) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दरम्यान या घटनेने पाटण तालुक्यात खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास सहाययक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी करीत आहेत.









