प्रतिनिधी/ पाटण
कोयना प्रकल्पग्रस्तांचे एका बाजूला पात्र खातेदारांचे संकलन रजिस्टर बनविण्याचे काम सुरू असताना दुस्रया बाजूला मात्र जमीन मागणीचे प्रस्ताव रायगड व सोलापूर जिह्यात सातारहून पाठवायचे काम सुरूच आहे.हे नेमके पात्र खातेदार आहेत की नाहीत याची खात्री न करता जमीनींचे वाटप केले जात आहे.असे बेकायदेशीर काम करणा-या सबंधित जिह्यातील अधिकारी,कर्मचारी यांचेवर चौकशी समिती नेमून कारवाई करावी तसेच झालेले बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी निवेदनाद्वारे प्रधान सचिव, पुनर्वसन विभाग मंत्रालय (मुंबई) यांना केली आहे,
निवेदनात म्हटले आहे की कोयना धरण आणि अभयारण्य या प्रकल्पाच्या पात्र प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर अजूनही पूर्ण नाही. यामुळे त्यांचे संकलन रजिस्टर पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना जमीन व भूखंड वाटप पूर्णपणे बंद आहे.तसेच याविषयी 2018 व 2019 साली कोयना प्रकल्पग्रस्तांची मोठी आंदोलने झाली. परिणामी दोन्ही वेळेला मंत्रालयात झालेल्या बैठका व यानंतर पुणे येथे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जमीन वाटपाबाबत चर्चा झाली,
कोयना धरण आणि अभयारण्य या प्रकल्पाच्या पात्र प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर अध्यापपर्यंत तयार नाही. श्रमिक मुक्ती दलाने याविषयीची ठोस भूमिका घेऊन कोयनेचे खरे पात्र प्रकल्पग्रस्त कोण व किती याबाबत संकलन रजिस्टर तयार करून किती खातेदारांना जमीन मिळाली,किती खातेदारांना अंशतः जमीन मिळाली या सर्व बाबी तपासून जे अजूनपर्यंत जमीन व प्लॉट पासून वंचित आहेत त्यांना पुनर्वसन कायद्यानुसार जमीन व प्लॉट मिळावा अशी आग्रही भूमिका घेतली आहे.परंतु एका बाजूला पात्र खातेदारांचे संकलन रजिस्टर बनवण्याचे काम चालू असताना दुस्रया बाजूला मात्र जमीन मागणीचे प्रस्ताव रायगड व सोलापूर जिह्यात साताराहुन पाठवायचे काम सुरूच आहे हे नेमके पात्र प्रकल्पग्रस्त आहेत की नाही याची खात्री झालेली नसताना असे बेकायदेशीर कृत्य केले जात आहे.
याबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे, पण कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. त्याच बरोबर सातारा पुनर्वसन कार्यालयास माहिती अथवा कल्पना नसताना सोलापूर जिह्यात मात्र जमीन व भूखंड वाटप आजही बेकायदेशीरपणे सुरू आहे त्याची वेगवेगळ्या बैठकीत चर्चा होऊन सुद्धा कारवाई होत नाही.त्यामुळे सातारा ,रायगड व सोलापूर जिह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांना अशा काळात जमीन कशी काय वाटली गेली याबाबत संबंधित जिह्यातील पुनर्वसन विभागाची चौकशी करून झालेले बेकायदेशीर वाटप रद्द करावेत तसेच ज्या कर्मचायांनी असे बेकायदेशीर व्यवहार केले आहेत अशा कर्मचायांच्यावर चौकशी समिती नेमून कठोर कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी निवेदनात केली असून या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त पुणे यांना देण्यात आली आहे,
पाऊस, थंडीतही कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच,
गेल्या दोन तीन दिवसांपासून पाटण, कोयना, जावली ,महाबळेश्वर परिसरात मान्सूनचा संततधार पाऊस पडत असुन हवेत गारवा निर्माण झाला आहे, अशा पावसातही कोयना प्रकल्पग्रस्तांचे आपल्या अंगणात ठिय्या देऊन आंदोलन सुरूच असून, पाऊस, थंडीचा जोर दिवंसेदिवस वाढत असला तरी याची तमा न बाळगता प्रकल्पग्रस्त जनता आपल्या न्याय हक्कासाठी एक वेळचे अन्न वर्ज्य करून आपल्या अंगणात, घरात गेले दहां दिवसापासुन मुलांबाळासह ठिय्या मांडून बसले आहेत.








