प्रतिनिधी / सातारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित विविध विषया संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ग्रहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथून सहभाग घेतला होता.या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे व संबंधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये एक महिन्याच्या आत प्रकल्पग्रस्तांचे सुधारित संकलन रजिस्टर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. तसेच महाजेनको व महावितरण या ज्या विद्युत विभागाच्या कंपन्या आहे, त्याच्यामध्ये कोयनेच्या मुळ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले जात नाही. कोयना प्रकल्पग्रस्तांना या विद्युत कंपन्यामध्ये विशेषबाब म्हणून सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मान्यतेने त्यांच्यावरही सहानुभूतीने निर्णय घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला.









