धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढल्यामुळे गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीपातळीत 41 हजार 389 क्युसेक आवक सुरु झाली आहे. धरणातील पाणीसाठा 82.75 टीएमसी झाला असताना धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्या उपस्थितीत धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उरमोडी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता कोयना जलसिंचन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाटय़ाने वाढून धरणाच्या पाणीसाठय़ाने ऐशी टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरणाच्या पाणीसाठय़ाने गेट लेव्हलही पार केली. पावसाचे अद्याप दोन महिने बाकी असून 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱया कोयना धरणातील पाणीसाठा स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच 77 टक्के झाला असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्या उपस्थितीत धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या विसर्गामुळे अगोदरच दुथडी वाहात असलेल्या कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 112 मिलिमीटर, नवजा येथे 122 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 177 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारी पाण्याची आवक कमी होऊन प्रतिसेकंद 20 हजार 694 क्युसेक झाली. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढल्यास आता कोणत्याही क्षणी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग वाढविला जाईल, असे कोयना सिंचन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 83.36 टीएमसी इतका झाला आहे.
ऑगस्टमध्येच धरण पूर्ण भरण्याची शक्यता
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चार, पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रत्येक दिवशी धरणाच्या पाणीसाठय़ात सरासरी 2 ते 3 टीएमसी पाण्याची वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवकही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 22 टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास ऑगष्ट महिन्यातच कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी शक्यता आहे.
चारही पर्जन्यमापन केंद्रांवर 3 हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार
कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या सर्वाधिक पावसाची ठिकाणे समजल्या जाणाऱया पर्जन्यमापक केंद्रावर शुक्रवारी अनुक्रमे 3032, 3369 आणि 3376 मिलिमीटर इतका एकुण पाऊस झाला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील तीनही पर्जन्यमापक केंद्रानी 3 हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला. या केंद्रांवर सरासरी वार्षिक 5 हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो मात्र गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने कोयना पर्जन्यमापक केंद्रावर 7335, नवजा येथे 8393 तर महाबळेश्वर येथे 7314 मिलिमीटर इतक्या एकुण पावसाची नोंद झाली आहे.








