प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरणाच्या पाणीसाठय़ाचे नियोजन हे 1 जून ते 31 मे तांत्रिक वर्षानुसार होत असते. मंगळवारी नुकतेच धरणातील उपलब्ध पाणीसाठय़ाचे नवीन तांत्रिक वर्ष सुरू झाले, मात्र या वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे पावसाळ्यापूर्वीच धरणात 29.27 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी धरणातून 31 मे अखेर 3217.258 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपूर्तीच्या लवादाचे 1 जून ते 31 मे या वर्षासाठी असते. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार कोयना धरणातील उपलब्ध पाणी साठय़ापैकी 67.50 टीएमसी पाणीसाठा हा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी असतो तर पूर्वेकडील सिंचनासाठी 30 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो.
दरम्यान लवादानुसार गतवर्षी वीजनिर्मितीसाठी 67 तर सिंचनासाठी 32 टीएमसी पाण्याचा वापर करूनही नवीन चालू वर्षात तब्बल 29 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा कोयना धरणात शिल्लक आहे. त्यामुळे जुलै अखेरीपर्यंत जरी पावसाला सुरुवात झाली तरी वीजनिर्मिती चिंता नाही, हे उपलब्ध पाणीसाठय़ावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान गतवर्षी जूनच्या सुरवातीला कोयना कोयना धरणात 34.18 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता.
पर्जन्यमापकाची गरज..!
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस सॅटेलाईटद्वारे मोजला जातो. वारंवार इंटरनेट सेवा बंद पडत असल्याने त्याचे अचूक मोजमाप होत नाही. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेवरून कोयना पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापक यंत्रणा बसवली आहे. त्या ठिकाणी अनुभवी पर्जन्यमापकाची नियुक्ती करावी, असे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, यावर्षी पावसाळा अगदी तोंडावर आल्याने कोणत्याही क्षणी पाणलोट क्षेत्रात मान्सून सुरू होण्याची शक्यता असतानाही अद्यापही पर्जन्यमापकाची नियुक्ती झाली नसल्याचे दिसून येते.








