धरणात १०५ टीएमसी पाणीसाठा
प्रतिनिधी / नवारस्ता
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण मंगळवारी पहाटे फुल्ल काठोकाठ भरले. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास आता कोणत्याही क्षणी धरणातून पुन्हा पाणी सोडण्याची शक्यता वाढली आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १४ ऑगष्ट पासून उघडण्यात आले होते. धरणाचे दहा फुटांपर्यंत दरवाजे उघडून कोयना धरणातून सुमारे ५६ हजार क्यूसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोका ही निर्माण झाला होता.
मात्र, संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा विजगृह बंद झाले होते. तरीही धरण पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस सुरूच असल्याने आणि पाणलोट क्षेत्रातुन येणाऱ्या पाण्याची आवक सुरूच राहिल्यामुळे आज मंगळवारी पहाटे धरणाच्या पाणीसाठ्याने निर्धारित १०५ टीएमसी चा टप्पा गाठला आणि संपूर्ण राज्याला आनंदाची बातमी दिली.
दरम्यान, हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पाणलोट क्षेत्रात जर पावसाला पुन्हा सुरवात झाली तर आता कोणत्याही ही क्षणी धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू करण्याची श्यक्यता वाढली आहे.