तांत्रिक वर्ष संपण्यास दीड महिना शिल्लक; वीजनिर्मिती अखंड राहणार
राजेश भिसे / नवारस्ता
कृष्णा पाणीवाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला केवळ दीड महिना शिल्लक असताना कोयना धरणात अद्याप 60 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने वीजनिर्मिती अखंडित सुरु आहे. त्यामुळे आगामी कडक उन्हाळ्यातही राज्यावर भारनियमनाचा भार पडणार नाही.
गतवर्षी जून महिन्यापासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात पाण्याची ऐतिहासिक आवक झाल्याने कोयना धरण तीनवेळा पूर्ण भरून ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणी नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 16 फुटांपर्यंत उचलण्यात आले. धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज या पर्जन्यमापन केंद्रावर तर सर्वाधिक म्हणजे 10 हजार मिलिमीटर इतक्या ऐतिहासिक पावसाची नोंद झाली. परिणामी धरणाच्या पाणीसाठय़ात ऑक्टोबर महिन्यापर्यंत तब्बल 235.42 टीएमसी इतक्या ऐतिहासिक पाण्याची आवक झाली तर धरणातून 127.48 टीएमसी इतक्या प्रचंड पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे वरदायिनी समजले जाणाऱया कोयना धरणावर राज्याची वीज आणि तहान या दोन्ही गरजा भागविल्या जातात. त्यामुळे या कोयना धरणातील पाणीसाठय़ाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. दरम्यान याच धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर 30 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणीवाटप करारानुसार 1 जून ते 31 मे या कालावधी साठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील तब्बल 10 महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला असून आता केवळ दीड महिन्याचा कालावधी असतानाही धरणात सध्या 60.57 टी. एम. सी.इतका मुबलक व समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चालू वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही आगामी नवीन तांत्रिक वर्षारंभाला येथे आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहील, अशी स्थिती आहे.
परिणामी या पाण्यावर अखंडित वीजनिर्मिती सुरू असून नवीन तांत्रिक वर्षात जरी जूनअखेर पाऊस पडला नाही तरी वीजनिर्मिती शक्य होणार असल्याने कडक उन्हाळ्यात ही राज्यातील जनतेची भारनियममनापासून मुक्तता होणार आहे.
आजपर्यंत वीजनिर्मिसाठी 51 टीएमसी पाण्याचा वापर
दरम्यान कोयना धरणातील सोमवार 13 एप्रिल रोजीची पाणीपातळी 2119.03 फूट व 645.947 मीटर असून पाणीसाठा
60.57 टीएमसी इतका शिल्लक आहे तर वीजनिर्मितीसाठी आजपर्यंत धरणातील 51.26 टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थान विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.