पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, सहा वक्र दरवाजातून 9274 क्युसेकचा विसर्ग
प्रतिनिधी / नवारस्ता
कोयना धरण 100 टक्के भरले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. परिणामी धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाऊण फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 9 हजार 274 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्गही आणखी वाढविण्याची श्यक्यता कोयना सिंचन विभागाने व्यक्त केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला. कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊन पाणीसाठय़ाने निर्धारित पाणीपातळी ओलांडली. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 10 फुटांपर्यत उचलून कोयना नदीपात्रात 56 हजार क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे कराड, सांगली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर सप्टेंबर महिन्यात कमी झाला. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक मंदावली आणि अत्यंत धिम्या गतीने धरण भरू लागले. मंगळवारी कोयना धरण फुल्ल भरले असतानाच हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यासह कोयना पाणलोट क्षेत्रातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी पहाटे धरणाचे पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक आणि दुपारी एक वाजता पुन्हा धरणाचे सहा वक्र दरवाजांपैकी दोन दरवाजे एक फूट उचलून 3182 क्युसेक असे मिळून एकुण 4 हजार 232 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला. तर सायंकाळी पावसाचा जोर आणि पाण्याची आवक वाढू लागल्यामुळे पुन्हा धरणाचे सहाही वक्र दरवाजे पाऊण फूट उचलून धरणातून 7174 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2100 असे मिळून एकुण 9 हजार 274 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढविला जाणार असल्याचे कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले.
पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे 39 (4296) मिलिमीटर, नवजा येथे 46 (4972) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 26 (4926) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात प्रतिसेकंद 7 हजार 278 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 105.25 टीएमसी इतका झाला आहे.









