कोयना नदीला आता तांबडे पाणी, नदीकाठच्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
नवारस्ता/प्रतिनिधी
कोयना धरणातून सध्या पुर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा रंग बदलला आहे. ऐन हिवाळ्यात कोयना नदीपात्रात लालसर तांबडे पाणी वाहताना दिसत आहे. त्यामुळे घरोघरी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी कोयना काठावरील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असून अजूनही काही काळ कोयना धरणातील पाण्याचा तांबडा रंग कायम राहण्याची शक्यता आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पुर्वेकडील सिंचनासाठी सध्या कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, धरणातून नदीपात्रात सोडलेले पाणी लालसर आहे. त्यामुळे संपूर्ण कोयना नदीपात्रातील पाणी तांबडे दिसत आहे. पावसाळ्यातील चार महिने नदीपात्रातील पाणी गढूळ असते. मात्र, ऐन हिवाळ्यात देखील कोयना नदीपात्रातील पाण्याचा तांबूस रंग पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतींना याच गढूळ पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा करावा लागत आहे.त्यामुळे कोयना काठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.