वार्ताहर/ कास
खिरखंडी गावाचे नाव काढले तरी अंगावर काटा यावा अशी परिस्थिती. अनेकांनी गावाचे नावच ऐकले असेल पण प्रत्यक्ष जाण्याचा संबंध येणार नाही आणि जायचे म्हटले तरी ते एवढे सोपे नाही. हे गाव दुर्गम बामणोली भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात कोयना नदीच्या पलीकडे वसलेले गाव. गावासाठी रस्ता ही गोष्टच अस्तित्वात नाही त्यामुळे जगाशी संपर्क तोही फक्त बोटीतून. गावात पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा. पूर्वी ती वस्तीशाळा होती. शासनाच्या वस्तीशाळा योजनेतून 2001 साली गावच्या नशिबात शाळा आली. शिक्षक शंकर भोसले यांनी कठोर मेहनत घेऊन शाळा नावारुपाला आणून शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा मिळवून दिला. प्राथमिक शिक्षणाची सोय झाली तरी सहावी नंतर काय हा प्रश्न होताच. पुढील शिक्षण घ्यायचं तर शिवसागर ओलांडावाच लागणार. आणि मुलींनी हे शिवधनुष्य पेलले. अशा परिस्थितीतही या गावातील तीन मुली रोज बोटीचे सारथ्य करत गावापासून कोसो दूर असलेल्या अंधारी गावात येऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.
नुसती बोटीची कसरत असती एक वेळ परवडली असती पण बोटीतून उतरून ती बोट शेम्बडी प्रसिद्ध दत्तमंदिरात लाऊन तेथून कास जवळच्या अंधारी गावात डोंगर कपारीतून, जंगली श्वापदांच्या मार्गातून चालत येणे म्हणजे आगीतून उठून फुफाटय़ात पडण्यासारखेच. पण या सावित्रीच्या लेकी रोजच हे दिव्य पार करत आहेत. शेंबडी गावातून अंधारी पर्यंत दऱया-खोऱयातून चालत येणे व पुन्हा चालत जाणे असा हा दिनक्रम यात कधीही खंड पडत नाही. सकाळी सात वाजता घर सोडणाऱया मुली सायंकाळी उशिरा तिथून पुन्हा आपल्या घरी जातात. दिवसभर थकलेल्या असल्या तर दुसऱया दिवशी त्याच उत्साहाने शाळेत येतात. हा द्राविडी प्राणायाम लीलया पेलत शिक्षणाची भूक पूर्ण करुन उज्वल भविष्यासाठी संघर्ष करत आहेत.
माजी आमदार जी. जी. कदम प्रतिष्ठान संचलित ज्युनियर कॉलेज अंधारी, कास, फळणी येथे सारिका अशोक सपकाळ, पारू श्रीरंग सपकाळ या बारावीत तर प्रियांका श्रीरंग सपकाळ अकरावी वाणिज्य शाखेत शिकत आहेत. आई वडील शेती काम करतात. मुलींना शिक्षण देण्याची परिस्थिती नसतानादेखील ते मुलींना शिक्षण देत आहेत. विनाअनुदानित तत्वावर चालणाऱया या शाळेत प्राचार्य गंगाराम पडगे, प्राध्यापक विनायक पवार, प्राध्यापिका प्रियांका पडगे हे शिक्षक तन-मन-धनाने सेवा करत असून अशा अनुदानित भागात अनुदानित कॉलेजची गरज आहे.