गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश
ऑनलाईन टीम / मुंबई
कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पुढील एका महिन्याच्या आत सविस्तर प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी आज दिली.
कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्यस्थितीचा आढावा आज गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी घेतला. हा प्रकल्प श्री. देसाई यांचे संकल्पनेतून साकारला जाणार असून या प्रकल्पाला तातडीने मूर्त स्वरूप देण्यासाठी शासन स्तरावर भक्कमपणे पाठपुरावा त्यांनी केला आहे. या बहुउद्देशिय प्रकल्पाला मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी कोयना धरन भेटी दरम्यानतत्वत: मान्यता दिली असून या प्रकल्पाचा आराखडा तयार करून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश श्री.देसाई यांनी यावेळी दिले.
पावसाळ्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पुर परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी गट/सर्व्हे क्रमांक२५,२६,२७ या क्षेत्रातील जमीन महसूल विभागाची आहे. ती जागा महसूल विभागाकडून गृह विभाग अथवा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाकडे सादर करावा व त्यासाठी जलदगतीने पाठपुरावा करावा, असे निर्देश श्री.देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना दिलेत.
मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, साताराचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








