प्रतिनिधी / वाकरे
कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब मिळावी या हेतूने सांगरुळ फाटा,कोपार्डे (ता करवीर) येथे’ माणुसकीची भिंत ” या उपक्रमाचा शुभारंभ कॉन्ट्रॅक्टर शिवाजी कुंभार व जिल्हा बँकेचे निरीक्षक पंढरीनाथ पाटील, हॉटेल गुरुकृपाचे मालक युवराज कुंभार, सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. थंडीच्या दिवसात ऊसतोडणी, स्थलांतरित व इतर गरजू बांधवांसाठी माणुसकीची भिंत हा उपक्रम अतिशय मोलाचा ठरत आहे.
कोपार्डे माळावर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित बांधवांच्या मुलांसाठी गेले २ आठवड्यापासून सुरू असलेल्या ज्ञानांगण डे केअर सेंटरचा औपचारिक शुभारंभ डॉ. युवराज सुतार, राहुल खाडे यांच्या हस्ते पार पडला.डॉ. युवराज सुतार यांचा वाढदिवस फळांचा केक कापून साजरा केला. सर्व मुलांना शालेय वस्तू ( अंकलिपी, पोषक आहार वाटप करण्यात आले.
यावेळी उमेद सदस्य नविनचंद्र सनगर , राजाराम पात्रे , प्रकाश म्हेत्तर , सचिन बगाडे , विजय पाटील, विक्रम म्हाळुंगेकर, प्रकाश गाताडे इत्यादी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटात अनेक फिरस्ती भटक्या लोकांना रोजगार न मिळाल्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच शाळा, आश्रमशाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, पोषणाचा प्रश्नही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर उमेद फाउंडेशनने ज्ञानांगण डे केअर सेंटर ही संकल्पना राबवली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सकस, पोषक, पौष्टिक आहार पुरविण्यात येतो.









