वाकरे/ प्रतिनिधी
कोल्हापूर–गगनबावडा राज्यरस्त्यावरील गजबजलेल्या आणि वर्दळीच्या सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) येथील मुख्य चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनची तोडफोड करत अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटयांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. धक्कादायक बाब म्हणजे याच एटीएम मशिनमध्ये तिसर्यांदा चोरी झाली असल्याने सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र सुदैवाने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
याबाबतचे अधिक माहिती अशी की, कोल्हापुर–गगनबावडा राज्यरस्त्यावर एका व्यावसायिक इमारतीत बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या चौकात हे एटीएम केंद्र आहे. सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या एटीएमचे केंद्राचे शटर उचकटून एटीएम केंद्रात प्रवेश केला. त्यांनी एटीएम केंद्रातील मशीनची तोडफोड करत सीसीटीव्ही कॅमेरा आणि अन्य यंत्रणा तोडून टाकली. मात्र सुदैवाने त्यांना कॅशबॉक्स तोडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न यशस्वी ठरला. मात्र चोरट्यांनी मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यापूर्वी दोन वेळा जानेवारी महिन्यात हे एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिसऱ्यांदा हे एटीएम लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या चोरीची माहिती मिळाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि बँकेची रक्कम सुरक्षित असल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेची नोंद करवीर पोलीसात झाली आहे.









