प्रतिनिधी / वाकरे
कोपार्डे ता.करवीर येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ठिकाणी भानामतीचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराची गावामध्ये चर्चा सुरू झाली आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी उडाली असून गावपातळीवर अनेक चर्चा सुरू आहेत.
कोपार्डे गावामध्ये मागील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या दरम्यान अमावस्येच्या रात्री स्मशानभूमी परिसरात भानामतीचा प्रकार करण्यात आला होता. यावर्षीही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी पूर्वी अमावस्येच्या रात्री स्मशानशेड, आरोग्य उपकेंद्र दवाखाना आणि जनावरांचा बाजार या तीन ठिकाणी काळ्या कापडात नारळ, लिंबू ,दहीभात,सुई ,बीबा,अंडे, दारूची बाटली, बाहुल्या, हळदी कुंकु, टाचण्या ठेवून पूजा केली होती.
हा प्रकार लक्षात येताच कोणामध्ये वादावादीचा प्रकार घडून नये म्हणून या तीन ठिकाणच्या वस्तू एकत्र करून स्मशानभूमीमध्ये पेटविण्यात आल्या. मात्र गावामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना हा प्रकार घडल्याने हा प्रकार कोणी केला असेल याची चर्चा रंगली आहे .









