प्रतिनिधी / अहमदनगर
राजकीय नेत्यांचा कार्यक्रम म्हटलं की, सगळं कसं अगदी यथासांग पार पडलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट डोळ्यात तेल टाकून योग्य पद्धतीने होते की नाही यासाठी अधिकारी वर्ग आणि कार्यकर्ते तत्पर असतात. पण असं असताना काही अक्षम्य अशा चुका घडतात तेव्हा मात्र, नेत्यांना देखील राहवत नाही आणि सगळ्यांसमोरच ते आयोजकांना थेट सुनावतात. असाच काहीसा प्रकार हा सोमवार 22 नोव्हेंबर रोजी अहमदनगरमध्ये घडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एखाद्या कामबाबत किंवा एखाद्या गोष्टीसाठी किती सजग असतात त्याचाच पुर्नप्रत्यय हा अहमदनगरमध्ये देखील आला. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्घाटनाच्या कोनशिलेवर असलेली एक चूक लक्षात आल्यावर अजित पवारांनी अक्षरश: आपल्या डोक्यावर हात मारुन घेतला. एवढंच नव्हे तर त्यांनी तात्काळ ती चूक निदर्शनास देखील आणून दिली.
कारण कोनशिलेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याच नावाबाबत ही चूक करण्यात आली होती. उद्घाटनासाठी जी कोनशिला बसविण्यात आली होती. त्यावर हसन मुश्रीफ यांचं नाव चक्क ‘हसन मुस्त्रीफ’असं लिहिण्यात आलं होतं. ज्यामुळे अजित पवार संतापले. पण आयोजकांना योग्य शब्दात समज देऊन अशा चुका न करण्याचा सल्लाही त्यांनी दिली.








