भिंतीसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी कशाप्रकारे वसूल करणार? : नव्याने बांधकामासाठी 100 कोटी अनुदानातून पुन्हा निधी मंजूर

प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्ली नाल्याची भिंत कोसळल्याने नव्याने बांधण्यासाठी 100 कोटी अनुदानातून निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यापूर्वी बांधण्यात आलेली भिंत सहा महिन्यांतच कोसळल्याने भिंतीचे पुनर्रबांधकाम करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर होती. पण सदर काम झालेच नाही. त्यामुळे खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
पूर्वी कोनवाळ गल्ली नाल्याच्या भिंतीचे बांधकाम दगडी होते. मात्र पावसामुळे भिंत कोसळली होती. त्यामुळे महापालिकेच्या निधीमधून भिंतीचे बांधकाम करण्यासाठी 20 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संज्योत बांदेकर यांच्या उपस्थितीत नाल्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. कोनवाळ गल्ली मनपा कार्यालयाजवळील पुलापासून नाल्याच्या भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. सदर बांधकाम दगडांमध्येच करण्यात आले होते. जुन्या भिंतीवर नवीन बांधकाम करून नाल्याच्या भिंतीची उंची वाढविण्यात आली होती. मात्र बांधकाम झालेल्या पहिल्या पावसातच सदर भिंत कोसळली होती. टप्प्याटप्प्याने संपूर्ण भिंत नाल्यात कोसळल्याने बांधकामासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला. मात्र कोणतेही सरकारी काम केल्यानंतर दोन वर्षे देखभाल करण्याचा करार असतो. त्यामुळे सदर भिंतीचे पुनर्रबांधकाम करण्याची सूचना कंत्राटदाराला करण्यात आली होती. बांधकाम करण्याऐवजी काँक्रिटच्या भिंती उभारण्यासाठी सूचना करण्यात आली होती. त्या निधीमधून भिंतीचे बांधकाम करून देणे बंधनकारक होते. पण वर्ष उलटले तरी कंत्राटदाराने भिंतीचे बांधकाम केले नाही. मात्र सध्या सुनगार अड्डय़ापासून न्यूक्लियस मॉलपर्यंतच्या नाल्याच्या एका बाजूची भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर केला आहे. तसेच या कामाचा शुभारंभदेखील आमदार अनिल बेनके आणि माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. मात्र यापूर्वी कोसळलेल्या भिंतीच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने पुनर्रबांधकाम करून दिले नाही. याबाबत महापालिकेने कोणती कारवाई केली, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता बांधकाम व्यवस्थित झाले नाही आणि तांत्रिकदृष्टय़ा अयोग्य पद्धतीने बांधकाम केल्याने भिंत पहिल्याच पावसाळय़ात कोसळली होती. त्यामुळे भिंतीसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वसूल करणार की, अन्य कोणते काम कंत्राटदारांकडून करवून घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यावेळी आपण या पदावर नव्हतो. त्यामुळे यापूर्वीच्या बांधकामाबाबत आपल्याला कोणतीच माहिती नाही, या कामाची माहिती घेण्यात येईल, असे उत्तर दिले. उत्तर उपविभाग कार्यालयातील साहाय्यक अभियंते आणि साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांची बदली झाली आहे. त्यामुळे येथील भिंतीबाबत अधिकाऱयांना कोणतीच माहिती नाही. तसेच एकाही अधिकाऱयांनी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे यापूर्वीचे अभियंते देखील मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे खर्ची घातलेला निधी पाण्यात गेला काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









