प्रतिनिधी/ बेळगाव
पाऊस आला की, मागील वषीची पुरपरिस्थिती डोळयासमोर दिसून येते. मागील वषीप्रमाणे परिस्थिती निर्माण होवू नये याकरिता कोनवाळ गल्ली नाल्याची स्वच्छता करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन गल्लीतील नागरिकांनी माजी महापौर सरिता पाटील यांच्याहस्ते महापालिका आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे कोनवाळ गल्ली नाल्यासह शहर व उपनगरातील नाल्याची स्वच्छता करण्याचे निवेदन महापालिकेला देण्यात आले.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले होते. कोनवाळ गल्ली परिसरात नाल्यामध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित झाले नसल्याने रहिवाशांच्या घरात आणि जनावरांच्या गोठय़ात पाणी साचले होते. त्यामुळे मोठय़ाप्रमाणात त्रास सहन करावा लागला. यंदा पावसाळयापुर्वी नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतेसाठी आलेला जेसीबी नाल्यात रूतल्याने काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले नाही. सध्या नाल्यात कचरा साचला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे पावसाळयापुर्वी नाला स्वच्छतेचे काम तातडीने हाती घेवून पुर्ण करण्याची मागणीचे निवेदन कोनवाळ गल्लीतील नागरिकांनी महापालिका आयुक्तांच्या नांवे माजी महापौर सरिता पाटील यांच्याकडे दिले होते. निवेदनाची दखल घेवून माजी महापौर सरिता पाटील यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले असल्याचे सांगण्यात आल्याने भेट होवू शकली नाही. सध्या महापालिकेच्या सर्वच अधिकाऱयावर कोरोना पार्श्वभूमीवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. कार्यालयात अधिकारी भेटू शकले नाही. त्यामुळे सदर निवेदन आरोग्य विभागात सहाय्यक तांत्रिक अभियंते अभिषेक कंग्राळकर यांच्याकडे देवून कोनवाळ गल्लीसह शहर व उपनगरातील सर्व नाल्याची स्वच्छता करण्याची विनंती केली.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी नगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे, मनोहर हलगेकर आदी उपस्थित होते.









