70 डोस उपलब्ध असताना 500 हून अधिक नागरिकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात अनेक ठिकाणी सोमवारी लसीकरण करण्यात आले. परंतु लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचा प्रकार कोनवाळ गल्ली येथे घडला. लसीकरणाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचा नागरिकांना पूर्ण विसर पडल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे कोरोना प्रतिबंधापेक्षा कोरोना वाढण्याचाच धोका अधिक असल्याचे दिसून आले. दरम्यान उपलब्ध लस आणि नागरिकांची संख्या यांचा ताळमेळ घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
प्रशासनाकडून प्रत्येक विभागवार कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. इतर राज्यांमध्ये नोकरी, शिक्षणासाठी जाणाऱयांना लसीकरण महत्त्वाचे आहे. त्याचसोबत वृद्ध व्यक्तींना लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरण होणार हे समजताच नागरिक प्रचंड गर्दी करत आहेत. केवळ त्या विभागातीलच नाही तर इतर ठिकाणांहून येवून रांगा लावत असल्याने झुंबड उडत आहे. जिथे लस उपलब्ध आहे तेथे नागरिक गर्दी करीत आहेत.
सोमवारी कोनवाळ गल्ली येथे नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार 70 डोस उपलब्ध असताना 500 हून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. डॉक्टरांकडून सूचना करूनही नागरिक ऐकण्यास तयार नव्हते.
वादावादीचे प्रकार
कोनवाळ गल्ली येथील शाळेमध्ये लसीकरण सुरू असताना नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेकजण रांगेत मध्येच घुसत होते. महिला व पुरुष अशा स्वतंत्र रांगा करणे गरजेचे असताना सर्वच जण गर्दी करत असल्याने चेंगराचेंगरी होत होती. यामुळे वादावादीचे प्रकार होत होते.
तरुणाई-विद्यार्थ्यांची लस घेण्यासाठी गर्दी
आरोग्याची चिंता लागल्याने आता प्रत्येकजण लस घेण्यासाठी धडपड करीत आहे. विद्यार्थ्यांनासुद्धा लस घेणे आवश्यक आहे. सध्या जरी वर्क फ्रॉम होम सुरू असले तरी कंपनी कधीही परत बोलवू शकते, अशावेळी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार या अंदाजाने तरुणाई आणि विद्यार्थी लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत.









